स्रेहा पावसकर, ठाणे बाप्पाची आरास म्हटले की मखर, झालर, सजावटीच्या माळा असल्या तरी डेकोरेशनला खऱ्या अर्थाने शोभा येते ती विद्युत रोषणाईमुळेच. दरवर्षीप्रमाणे यंदाही बाजारात विविध प्रकारची रंगीत विद्युत तोरणे आहेतच. त्यात आता विद्युत समई, दीपमाळ, कलश अशा विविध वस्तू विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. विद्युत तोरणांना एलईडी स्ट्रीपचा पर्यायही उपलब्ध आहे. एकंदरीतच बाप्पासाठी सजलेल्या इलेक्ट्रॉनिक्सच्या बाजारपेठेवर चायनामेडचे वर्चस्व दिसत आहे.बाप्पाची सजावट उठून दिसावी, या उद्देशाने विद्युत रोषणाई केली जाते. साध्या बल्बच्या तसेच ओम, जास्वंदाच्या, पानाफुलांच्या आकारांतील आकर्षक विद्युतमाळा ५० रुपयांपासून ते २०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. या विद्युतमाळांना एलईडी स्ट्रीपचा पर्याय असून स्ट्रीपचा आकार अगदी लहान असला तरी त्यातील एलईडी बल्बचा झगमगाट नयनरम्य दिसतो. मखरावरही या एलईडी स्ट्रीपचा वापर करून रोषणाई करणे शक्य आहे. याची किंमत कमीतकमी १०० रुपयांपासून ते जास्तीतजास्त ६०० रुपयांपर्यंत आहे. छोटी विद्युत दीपमाळ, समई यांची किंमत १००-१२० रुपये, तर मोठ्या समईची किंमत साधारण ४५० रुपये आहे. विविध आकार आणि डिझाइनमध्ये मिळणाऱ्या चेंजिंग बल्बला मागणी असून त्याची किंमत ८० पासून ते २५० रुपयांपर्यंत आहे. लेझर लेड डिस्को बॉलची किंमत ६०० रुपये आहे. आरती आणि मंत्र इनबिल्ट असलेले छोटे मंदिर यंदाही बाजारात विक्रीसाठी आहे. यात सलग ११ आरत्या आणि मंत्र ऐकायला मिळतात. त्याची किंमत १२० ते ३०० रुपये आहे. त्याचबरोबर श्री गणेशाय नम:, ओम गण गणपतये नम: लिहिलेल्या विद्युतपट्टीची किंमत साधारण १०० रुपये आहे. फोकस लाइट ८० रुपयांपासून उपलब्ध आहेत. मात्र, यापैकी कोणत्याही वस्तूची गॅरंटी कोणतेही विक्रेते देत नाहीत.
इलेक्ट्रॉनिक्सच्या बाजारपेठेवर चिनी बनावटीचे वर्चस्व
By admin | Updated: September 1, 2016 03:02 IST