पारोळ : गेल्या तीन ते चार दिवसांपासून रोज पहाटे व संध्याकाळच्या सुमारास खानिवडे नाक्यावरील टोल वसुलीच्या दिरंगाईमुळे वाहतूक कोंडी होत असून २२ डिसेंबर रोजी पहाटे ३ ते ९.३० असा सहा तासांपेक्षा जास्त काळ वाहतूककोंडीचा सामना चालकांना करावा लागला. याबाबत खानिवडे नाका प्रशासनाने सांगितले कि, कार्ड स्वाईप करण्यास लागणारा वेळ, दोन हजाराच्या नोटांसाठी सुटे देण्यास लागणार काळ, यामुळे लागलेल्या रांगांतून सुटण्यासाठी वाहन चालकांनी उलट दिशेने चालवलेली वाहने, त्यात सकवार व खानिवडयाच्या मधल्या भागात रांगांतून बंद पडलेली वाहने आदी कारणांमुळे व एकूणच टोल वसुलीसाठी असलेल्या वाहिन्यांची वाहनांच्या तुलनेत कमी असलेली संख्या यामुळे ही कोंडी होत आहे. जरी वरील कारणे वाहतूककोंडीस कारणीभूत असली तरी येथील टोल कर्मचाऱ्यांचा ढिम्मपणा व कोंडी सोडवण्याबाबतची निष्क्रियता ही वाहतूक कोंडीला कारणीभूत असल्याचे वाहन चालक सांगत आहेत. नवी मुंबईतील वाहन चालक गौरांग मेहता या कोंडीत तीन तासांपेक्षा जास्त वेळ अडकल्याचे सांगत होते तर गुजरातमधील चालक आसिफ अहमद कोंडीच्या मधल्या भागात सुमारे अडीच तासापासून अडकल्याचे सांगत होते. वाहतूककोंडी होऊ नये म्हणून आम्ही आमच्या परीने सर्व प्रयत्न करीत असल्याचे येथील पोलिसांचे म्हणणे असले तरी येथून प्रवास करणाऱ्यांना या वाहतूककोंडीचा त्रास सहन करावा लागला.
कार्ड व सुट्यांमुळे टोलधारेची गती मंद
By admin | Updated: December 23, 2016 02:47 IST