काजूपाड्याचे वळण ठरतेय धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 05:41 AM2019-02-21T05:41:33+5:302019-02-21T05:42:12+5:30

वारंवार घडतात अपघात : रस्ता सरळ करण्याची नागरिकांची मागणी

The casualty of Kajupada is dangerous, it is dangerous | काजूपाड्याचे वळण ठरतेय धोकादायक

काजूपाड्याचे वळण ठरतेय धोकादायक

Next

भाईंदर : मीरा-भाईंदर महापालिका हद्दीतील घोडबंदर या मुख्य वाहतूक मार्गावरील काजूपाडा येथील रस्ता तीव्र वळणाचा असल्याने तेथे अनेकदा अपघात होतात. त्यामुळे येथील हा वळणाचा भाग काढून तो सरळ करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. पश्चिम मुंबईहून ठाणेमार्गे भिवंडी, कसारा, पुणे द्रुतगती महामार्गाकडे जाण्यासाठी घोडबंदर हा राज्य महामार्ग महत्त्वाचा आहे. हा महामार्ग महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील आहे. वरसावे वाहतूक जंक्शनपासून पुढे ठाणे महापालिका हद्दीत या महामार्गाचा विस्तार आहे. या महामार्गावरील काजूपाडा येथे तीव्र वळण असून त्याच्या एका बाजूला नागरीवस्ती आहे.

येथील नागरिकांना मुंबईच्या दिशेला जाण्यासाठी रस्ता ओलांडून तेथील बसथांब्यावर जावे लागते. तसेच नागरीवस्तीच्या बाजूलाही बसथांबा असून त्याअगोदर सुमारे १० मीटर अंतरावर तीव्र वळण आहे. त्यामुळे भरधाव वेगातील वाहनांचा अंदाज रस्ता ओलांडताना येत नाही. मुंबई दिशेकडील वळण सुमारे १५ ते २० फूट खाली खोल असून त्या बाजूला लोखंडी पट्ट्यांचे कुंपण घालण्यात आले आहे. परंतु, रात्रीच्या वेळी या वळणाचा अंदाज वाहनचालकांना येत नाही. महामार्ग असल्याने या मार्गावरील वाहने भरधाव वेगाने येजा करत असतात. तीव्र वळणाचा अंदाज वाहनचालकांना येत नसल्याने त्यांचे वाहनांच्या वेगावरील नियंत्रण सुटून ते खाली कोसळते अथवा ते उलटून अपघात होतो. याच मार्गावरून अनेक अवजड वाहनांची रेलचेल असल्याने त्या वाहनचालकांना या तीव्र वळणावरून वळण घेताना चांगलीच कसरत करावी लागते. त्यातच, वाहनांचा वेग कमी करण्यासाठी ब्रेक लावण्याचा प्रयत्न केल्यास ते वाहन उलटून अपघात होतो.
अपघातांची ही मालिका सतत सुरूच असते. मात्र, त्याकडे एमएसआरडीसीचे दुर्लक्ष होत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. काजूपाडा येथील ग्रामस्थांनी अनेकदा विविध सरकारी विभागांकडे संपर्क साधून वळण सरळ किंवा त्याची तीव्रता कमी करण्याची मागणी केली. परंतु, त्याला दाद दिली जात नसल्याने येथे अपघाताची मालिका आजही सुरूच आहे. काही महिन्यांपूर्वी ठाणे येथून बोरिवलीकडे जाणाऱ्या एसटीला याच वळणावर अपघात झाला होता. ती काही प्रमाणात एका बाजूला कलंडल्याने सुदैवाने ती उलटली नाही. मंगळवारी रात्रीही याच वळणावर एक ट्रेलर उलटला.

काजूपाडा येथील तीव्र वळणाच्या ठिकाणी पथदिवे असूनही ते अनेकदा बंद असतात. त्यामुळे रात्रीच्या वेळी प्रामुख्याने अवजड वाहनचालकांना वळणाची तीव्रता लक्षात येत नसल्याने वाहने उलटतात. याच ठिकाणाहून स्थानिक येजा करत असल्याने या अपघातात त्यांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे येथील तीव्र वळण काढून टाकणे अपघात टाळण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.
- राजेंद्र ठाकूर, स्थानिक समाजसेवक

Web Title: The casualty of Kajupada is dangerous, it is dangerous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.