लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड: मीरा भाईंदर-वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या पोलीस भरतीसाठी राज्यभरातून येणाऱ्या उमेदवारांवर भाईंदरच्या मैदानाबाहेरील रस्त्यावर व पदपथावर झोपण्याची पाळी येत आहे. ह्या उमेदवारांसाठी जवळपासच्या परिसरात पालिकेच्या मालमत्ता असून देखील तिकडे व्यवस्था केली जात नाही तर दुसरीकडे पोलीस प्रशासनाकडून देखील उमेदवारांना रस्त्यावर सोडल्याने टीकेची झोड उठत आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा
पोलीस आयुक्तालया मधील रिक्त असलेल्या ८४० पोलीस शिपाई व ८१ चालक शिपाई अश्या एकूण ९२१ पोलीस शिपाई पदाची भरती प्रक्रिया सुरु आहे. ८४० पोलीस शिपाई पदांसाठी तब्बल ३९ हजार २०९ तर अवघ्या ८१ चालक पदासाठी चक्क १८ हजार ७८८ इतके उमेदवारी अर्ज आले आहेत. एकूण ९२१ पदांसाठी ५७ हजार ९९० अर्ज आले असून ह्या भरतीचा शारीरिक चाचणी परीक्षेचा टप्पा हा २० फेब्रुवारी पासून भाईंदरच्या सुभाषचंद्र बोस मैदानात सुरु झाला आहे.
राज्य भरातून येणाऱ्या उमेदवारांना झोपणे, आंघोळ, प्रातःविधी आदींसाठी मैदानाच्या जवळपास परिसरात पोलीस आणि महापालिके कडून सोया झाली नसल्याने टीकेची झोड उठली. पहिल्याच महासभेत काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक अनिल सावंत यांनी उमेदवारांचे हाल होत असल्याचा मुद्दा उपस्थित करत त्यांची राहण्याची व्यवस्था महापालिकेने करावी अशी मागणी केली. महापौर डिंपल मेहता यांनी देखील उमेदवारांच्या सुविधे बाबत प्रशासनास सांगितले.
महापालिकेने भाईंदर पूर्व येथील पालिका सभागृहात उमेदवारांची राहण्याची व्यवस्था केली असली तरी मैदान पैंश्चिमेला असल्याने आणि पहाटे लवकर तेथे पोहचणे आवश्यक असल्याने उमेदवारांची गैरसोय होत आहे. कारण पूर्वे वरून पहाटे यायचे म्हटले तरी वाहने नाहीत आणि रिक्षा चालक मनमानी भाडे सांगतात. त्यामुळे आजही राज्यभरातून येणारे उमेदवार हे मैदानाच्या बाहेरील रस्त्यावर व पदपथावर रात्री झोपत आहेत.
वास्तविक भाईंदर पश्चिमेला नगरभवन सभागृह, विनायक नगर सभागृह आदी आहेत. परंतु पालिकेने मात्र थेट पूर्वेला तेही लांब भागात उमेदवारांची व्यवस्था केली आहे. पहाटे शारीरिक चाचणी साठी हजर रहायचे असल्याने उमेदवार हे सोबत आणलेली चादर वा मिळेल ते अंथरून रस्त्यावरच झोपत आहेत. रात्रीच्या वेळी डासांचा प्रचंड जाच असून देखील उघड्यावर झोपण्याची पाळी त्यांच्यावर आली आहे.
रात्री झोप कशीबशी लागली तर लागली नाहीतर जागरण करून पहाटे मैदानी चाचणी साठी उमे रहावे लागत आहे. या ठिकाणी सकाळी आंघोळ व प्रातःविधी साठी सार्वजनिक शौचालये असली तरी ती अपुरी आणि अस्वच्छ असून गैरसोयीची ठरत असल्याची नाराजी अनेक उमेदवारांनी बोलून दाखवली. खडतर शारीरिक श्रमाची परीक्षा मैदानात देण्यासाठी पुरेशी झोप व मानसिक मनोबल चांगले असणे आवश्यक आहे. मात्र आपल्याच राज्यात अशी बेवारस सारखी प्रतिस्थिती आणि हाल सहन करत परीक्षा द्यायची तरी कशी? असे प्रश्न देखील काहींनी केले.
जितेंद्र पाठक (शिंदेसेना शहर प्रमुख): पोलीस प्रशिक्षणासाठी येणाऱ्या उमेदवारांची निदान रात्री झोपण्याची व्यवस्था पालिकेने करावी म्हणून उपमहापौर यांना भेटून पत्र दिले तरी काहीहि सुविधा केली गेली नाही. पोलिसांची देखील भेट घेतली. पोलीस भरतीसाठी राज्यातून येणाऱ्या उमेदवारांची राहायची सोया देखील पालिका व पोलिसांनी न करणे लाजिरवाणे आहे.
सिद्धेश राणे (मीरा भाईंदर युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष): रात्रभर रस्त्यावर काढण्याची वेळ पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांवर येणे हि मुख्यमंत्री तथा गृहमंत्री पासून शासन आणि महापालिकेसाठी निंदनीय आहे. राज्यभरातून आलेल्या लाडक्या बहिणींची मुलं असे हाल सहन करत भरतीला सामोरे जातात याची लाज शासन आणि पालिकेला वाटत नाही हे माणुसकीहीनतेचे लक्षण आहे.
Web Summary : Candidates arriving for police recruitment in Mira-Bhayandar face hardships. Forced to sleep on streets due to lack of accommodation. The municipality's inaction and inadequate facilities add to their woes during physical tests.
Web Summary : मीरा-भायंदर में पुलिस भर्ती के लिए आए उम्मीदवार परेशान हैं। आवास की कमी के कारण सड़कों पर सोने को मजबूर हैं। शारीरिक परीक्षण के दौरान नगरपालिका की निष्क्रियता और अपर्याप्त सुविधाएं उनकी पीड़ा को बढ़ाती हैं।