ठाणे : आरटीई कायद्यांतर्गत मुलांना शाळा प्रवेश देण्यापासून मोफत शैक्षणिक साहित्य देताना पालकांची अडवणूक करणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील शाळांची मान्यता रद्द करण्याचा इशारा जिल्हा समन्वयक वैशाली शिंदे यांनी दिला आहे.समान शिक्षण अधिकारासाठी सुरू केलेल्या आरटीई प्रवेश योजनेंतर्गत असलेल्या गोंधळाबाबत जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यावर गुरुवारी पालक डेमोक्रेटिक युथ फेडरेशन आॅफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांसह शिक्षण उपसंचालक कार्यालयात पोहोचले. मात्र, उपसंचालक बी.बी. चव्हाण व्यस्त असल्याने पालकांनी शिक्षण विभाग जिल्हा समन्वयक वैशाली शिंदे यांची भेट घेऊन त्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. नियमानुसार शैक्षणिक साहित्य, गणवेश विद्यार्थ्यांना मोफत देणे आवश्यक आहे. ते त्यांना शाळांकडून मोफतच मिळतील, असे आश्वासन शिंदे यांनी पालकांना दिले. त्यासंदर्भातील पत्र ठाणे जिल्हा शिक्षण विभागाला पाठवले, अशी माहिती फेडरेशन आॅफ इंडियाचे नितीन धुळे यांनी दिली. यानंतरही ज्या शाळा शालेय साहित्यासाठी म्हणून शुल्क आकारतील, त्यांची मान्यता रद्द केली जाईल, असेही शिंदे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
मोफत शिक्षण साहित्य न देणाऱ्या शाळांची मान्यता रद्द?
By admin | Updated: March 24, 2017 01:13 IST