नोटाबंदीमुळे रोडावलेली घर, सोने व वाहन खरेदी गुढीपाडव्यानिमित्त वधारल्याचे चित्र ठाणे जिल्ह्यात पाहायला मिळाले. ठाण्यात ३३६ तर कल्याणमध्ये ४६ वाहनांची नोंदणी झाली. दिवसाकाठी जेमतेम १० घरांची विक्री होत असताना २५० घरांचे जिल्ह्यात मंगळवारी बुकींग झाले. पाडव्याच्या मुहूर्तावर सोने खरेदीचा उत्साह पाहायला मिळाला. प्राथमिक अंदाजानुसार १००० कोटी रुपयांच्या आसपास सोने खरेदी झाल्याचे समजते.सराफ बाजारात नोटाबंदीनंतर चैतन्य डोंबिवली : केंद्र सरकारच्या नोटाबंदीमुळे सराफ बाजारावर आलेले मंदीचे सावट आता दूर झाले असून गुढीपाडव्यानिमित्त सोने खरेदीचा उत्साह ग्राहकांमध्ये दिसून आला. मार्च अखेरीस देशभरात ७०० टन सोन्याची विक्री होणे अपेक्षित असून ठाणे जिल्ह्यातही तोच खरेदीचा जोर दिसत आहे. ठाणे जिल्ह्यात झालेल्या सोने खरेदीची नेमकी आकडेवारी दोन-तीन दिवसांनंतर प्राप्त होईल, असे सराफांच्या संघटनेने स्पष्ट केले. मात्र पाडव्यानिमित्त किमान १००० कोटींच्या घरात सोने खरेदी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.नोटाबंदीच्या निर्णयानंतर एटीएममसह बँकेतून रोकड काढण्यावर निर्बंध लागू केले होते. ते आता पूर्णपणे उठवले असल्याने सराफ बाजारात काही महिन्यांपूर्वी आलेली मरगळ दूर झाली आहे. ठाणे, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर येथील नामांकित सराफांच्या पेंढ्यांवर मंगळवारी गुढीपाडव्यानिमित्त सोने खरेदीकरिता ग्राहकांनी गर्दी केली होती. त्यामुळे सराफ व्यावसायिकांमध्ये चैतन्याचे वातावरण होते. सोने व दागिने खरेदीला दिवसभर चांगली मागणी असल्याची माहिती आॅल इंडीया जेम्स अँड ज्वेलरी ट्रेड फेडरेशन असो.चे विभागीय संचालक, ठाण्याच्या चिंतामणी ज्वेलर्सचे संचालक नितीन कदम यांनी दिली.मंगळवारी तोळ्यामागे दोन प्रतींच्या सोन्याचा भाव २८ हजार ९०० तसेच ३० हजार ३०० असा होता तर चांदीचा दर किलोमागे ४२ हजार ७०० रुपये होता. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर स्त्रीधन म्हणून सोने खरेदीत गुंतवणूक करण्याकडे ग्राहकांचा कल असतो. नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये सोने खरेदी रोडावली होती. मात्र आता जानेवारी, फेब्रुवारी तसेच मार्चदरम्यान खरेदी वाढलेली आहे. देशभरामध्ये ७०० टन सोन्याचा व्यवहार मार्च अखेरपर्यंत होणे अपेक्षित आहे, असा विश्वास कदम यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)अडचणीत सोने येते कामीमुंबई, ठाण्यातील सुमारे ३ हजारांहून अधिक सराफ व्यापाऱ्यांमध्ये उत्साह, चैतन्याचे वातावरण आहे. नागरिकांमध्ये सोन्यात गुंतवणूक करण्याची इच्छा प्रबळ आहे. सोने अडीअडचणीला कामी येते, अशी माहिती डोंबिवलीतील सराफ व्यावसायिक प्रफुल (पप्पू) वाघाडकर यांनी दिली. ठाण्यात ३३६ तर कल्याणमध्ये ४६ वाहनांची नोंदणी ठाणे : ठाणे प्रादेशिक परिवहन विभागामार्फत यंदा वाहनांच्या आॅनलाइन नोंदणीची गुढी उभारली गेली असून, त्याला ठाणेकरांचा चांगला प्रतिसाद लाभला. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर ठाण्यात विविध ३३६ वाहनांची नोंदणी झाली असून यामध्ये २५४ दुचाकी वाहनांचा समावेश आहे. वाहन ०४ नावाचे अद्यावत ई-रजिस्ट्रेशन सॉफ्टवेअर विकसित केले असून त्याद्वारे वाहनांची नोंदणी वितरकांमार्फत थेट आॅनलाइन पद्धतीने सुरु केली आहे. ठाण्यात दुपारपर्यंत ३३६ वाहनांची नोंदणी झाली होती. ही नोंदणी वाढण्याची शक्यता आरटीओ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. नोंदणी झालेल्या वाहनांमध्ये २५४ दुचाकी, ३५ चारचाकी तर ४६ इतर वाहनांचा समावेश असल्याची माहिती आरटीओने दिली. तर कल्याण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अवघ्या ४६ वाहनांची नोंदणी झाली आहे. यामध्ये ४५ दुचाकी तर एकाच चारचाकी वाहनाचा समावेश आहे. (प्रतिनिधी)250 घरांची विक्री नोटाबंदीनंतर ठाण्यात प्रथमच गृह खरेदीत तेजी आल्याचे दिसून आले. गृहकर्जावरील व्याजात झालेली कपात, मार्चअखेर आणि प्रधानमंत्री आवास योजनेच्या अनुदानामुळे सर्वसामान्यांचा कल हा घर खरेदीकडे अधिक असल्याचे दिसून आले. गेले काही महिने रोज पाच ते दहा घरांची विक्री होत असताना गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मात्र, तब्बल २५० घरांची विक्री झाल्याची माहिती आहे.गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर बिल्डरांनी आकर्षक योजनांची घोषणा केली होती. तसेच किमतींमध्ये प्रतीचौरस फूट सवलत जाहीर केली होती. नोटाबंदीनंतर ठाण्यात गृहखरेदीमध्ये प्रचंड घसरण झाली होती. शहरात १० हजारांच्या आसपास रिकामी घरे पडून होती. ठाण्यातील घर खरेदीकरिता वातावरण चांगले असून, सांस्कृतिक शहर म्हणूनही या शहराची ओळख आहे. त्यामुळे इतर शहरांच्या तुलनेत ठाण्याला अधिक पंसती मिळत असल्याची माहिती एमसीएचआयचे माजी अध्यक्ष मुकेश सावला यांनी दिली. परंतु, असे असले तरी आजकाल गृह खरेदीसाठी सणांची वाट पाहिली जात नाही. विकासकामे चांगली योजना दिली आणि खरेदी करणाऱ्याच्या खिशात पैसे असतील तर कोणत्याही दिवशी गृह खरेदी केली जाते, असे त्यांनी स्पष्ट केले.
हजार कोटींची सोने खरेदी
By admin | Updated: March 29, 2017 05:51 IST