मेहुणीच्या लग्नासाठी केली वृद्ध घरमालकाची नृशंस हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 12:54 AM2019-01-29T00:54:13+5:302019-01-29T00:54:22+5:30

मेहुणीचे लग्न जवळ आले. लग्नाची जबाबदारी आपल्या अंगावर असली, तरी खिशात दमडीही नसल्याच्या चिंतेने २५ वर्षीय अमरजित सतीराम राजभर याला पोखरून काढले होते.

The brutal murder of the elderly homeowner for the marriage of sister-in-law | मेहुणीच्या लग्नासाठी केली वृद्ध घरमालकाची नृशंस हत्या

मेहुणीच्या लग्नासाठी केली वृद्ध घरमालकाची नृशंस हत्या

googlenewsNext

-सचिन सागरे, कल्याण

मेहुणीचे लग्न जवळ आले. लग्नाची जबाबदारी आपल्या अंगावर असली, तरी खिशात दमडीही नसल्याच्या चिंतेने २५ वर्षीय अमरजित सतीराम राजभर याला पोखरून काढले होते. कुठूनच पैशाची सोय होत नसल्याचे पाहून, कल्याणजवळील मोहने परिसरात राहणारे त्याचे ९२ वर्षीय घरमालक महादेव जयराम जाधव यांचे घर ‘साफ’ करण्याचा कट त्याने रचला; मात्र ऐनवेळी घरमालकास जाग आली आणि आता चोरीचा कट फसून मेहुणीचे लग्न अडचणीत येते की काय, अशी भीती अमरजितला वाटली. जिवापेक्षा पैशाचे मोल अमरजितला जास्त वाटले आणि त्याने अंगाचा थरकाप उडेल अशा पद्धतीने वृद्ध घरमालकाची नृशंस हत्या केली. पैशांसाठी घरमालकाची हत्या करुन त्यांचे डोळे फोडणाऱ्या अमरजितला पोलिसांनी २४ तासांच्या आत बेड्या ठोकल्या.

बुधवार, ११ एप्रिल २०१८ रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास खडकपाडा पोलीस ठाण्याचा दुरध्वनी खणखणला. ठाणे अमलदार तडवी यांनी दुरध्वनी घेतला असता कल्याणजवळील मोहने यादवनगर परिसरात असलेल्या बेड्यावरील एका वृध्दाची हत्या झाल्याची माहिती त्यांना पलिकडून देण्यात आली. तडवी यांनी ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब कदम आणि सहायक पोलीस निरीक्षक दिनेश सोनावणे यांना दिली. वरिष्ठांनी पोलीस हवालदार दीपक पाटील, औदुंबर कोकाटे, सुरेश बडे यांच्यासोबत घटनेच्या ठिकाणी धाव घेतली. ज्या ठिकाणी महादेव जयराम जाधव यांचा मृतदेह पडला होता, त्याठिकाणी रक्ताने माखलेला लाकडी बांबू पडलेला होता. त्याच दांडक्याने महादेव यांच्या डोक्यावर आणि चेहºयावर मारहाण करुन जखमी करण्यात आले होते. दांडक्याच्या टोकाने महादेव यांचे दोन्ही डोळेही फोडण्यात आल्याचे घटनास्थळाच्या पाहणीवरुन दिसून आले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त डॉ. संजय शिंदे, सहायक पोलीस आयुक्त दत्तात्रय कांबळे यांनीदेखील घटनास्थळी येऊन मृतदेहाची पाहणी केली. महादेव यांच्या मृतदेहाचे निरीक्षण करत असताना पोलिसांना त्यांच्या मुठीत केस आढळून आले. त्यानुसार हत्या होण्यापूर्वी महादेव यांची मारेकºयासोबत झटापट झाल्याचा कयास बांधून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली.

मोहने यादवनगर परिसरात बेड्यावरील जागेत बांधलेल्या एका घरात महादेव हे त्यांची पत्नी पार्वतीबाई (८५) यांच्यासोबत राहत होते. घराच्या बाजूलाच असलेल्या शेतीची आणि शेळ्यांची देखभाल करण्याचे काम महादेव करीत होते. त्यांची तीन मुले मोहने गाव येथे कुटुंबीयांसोबत राहतात. दररोज सकाळ-संध्याकाळ बेड्यावरील घरी जाऊन त्यांना औषधोपचार, जेवण आणि नाष्टा देण्याचे काम हे तिघे करीत होते. ११ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास महादेव यांचा मुलगा हरिभाऊ बेड्यावरील घरात राहणाºया आपल्या आई-वडिलांकडे गेला होता. एरव्ही सकाळच्यावेळी महादेव अंगणातील ओट्यावर हमखास बसलेले असतात; मात्र हरिभाऊला ते ओट्यावर न दिसल्याने त्यांनी शोध घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी घराच्या बाजूला असलेल्या झाडाजवळ वडिलांना पालथ्या अवस्थेत पाहून हरिभाऊंचे पाय जागीच थबकले. जवळ जाऊन पाहिले असता महादेव यांच्या डोक्यातून रक्तस्त्राव होत असल्याचे दिसले. त्यांच्या चेहºयावर आणि डोक्यावर कोणत्यातरी वस्तूने मारहाण केल्याच्या जखमा होत्या. त्यांचे दोन्ही डोळे फोडण्यात आले होते. गंभीर दुखापतीमुळे कान आणि नाकातूनही रक्तस्त्राव होत होता. ते पाहून हरिभाऊ घाबरले. वडिलांना आवाज देऊन उठवण्याचा प्रयत्न त्यांनी केला; मात्र ते उठत नसल्याचे पाहून भयभीत झालेल्या हरिभाऊ यांनी भाऊ चंद्रकांत आणि चुलत काका बळीराम यांना या घटनेची माहिती दिली. खडकपाडा पोलिसांनाही या प्रकाराची माहिती देण्यात आली होती.

महादेव यांची हत्या कोणी आणि का केली असावी, याचा प्रथमदर्शनी कोणताही अंदाज बांधणे पोलिसांना कठिण झाले होते; मात्र त्यांच्या घरातील सामान अस्तव्यस्त अवस्थेत आढळून आल्याने चोरीच्या उद्देशाने हा प्रकार झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी लावला. हरिभाऊ यांच्या तक्रारीवरुन खडकपाडा पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब कदम यांनी गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक दिनेश सोनावणे यांच्याकडे सोपवला. दुसरीकडे, कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांनीदेखील आपल्या सहकाºयांसह घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

ही घटना चोरीच्या उद्देशाने झाल्याच्या संशयावरून खडकपाडा पोलिसांनी परिसरातील भुरट्या चोरांची, तसेच घटनेच्या वेळी महादेव यांच्या घराजवळ कोण-कोण गेले होते, याबाबतचीही माहिती काढण्यास सुरुवात केली. याचदरम्यान यादवनगर परिसरात महादेव यांनी भाडेतत्वावर दिलेल्या एका रुममध्ये राहणारा अमरजित (२५) हा घटना घडल्यापासून बेपत्ता झाल्याची माहिती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांना माहितीदाराकडून मिळाली. याच माहितीच्या आधारे जॉन यांच्या पथकातील सहायक पोलीस निरीक्षक संतोष शेवाळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक ज्योतीराम साळुंखे, पोलीस हवालदार राजकुमार तरडे, पोलीस नाईक मोरेश्वर बाबरे, राजेंद्र खिलारे, सुरेश निकुळे, प्रकाश पाटील, पोलीस शिपाई अजित रजपूत यांनी अमरजितला शोधण्यास सुरुवात केली. त्यावेळी अमरजित हा मोहने परिसरात राहणाºया सासºयाकडे गेल्याची माहिती त्यांना मिळाली. तो उत्तरप्रदेशातील तेजपूरगाव या मूळ गावी पळण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर कल्याण गुन्हे शाखेने त्वरा करुन अमरजितला २४ तासांच्या आत ताब्यात घेतले.

मुळचा उत्तरप्रदेश येथील अमरजित काही महिन्यांपासून आपल्या कुटुंबासह मोहने यादवनगर परिसरात महादेव यांच्याकडे भाड्याच्या खोलीत राहत होता. याच परिसरात अमरजितची सासूरवाडी असून, सासºयाने भाडेतत्वावर घेतलेल्या शेतीमध्ये तो मोलमजुरीचे काम करीत होता. दरम्यान, गावी राहणाºया अमरजितच्या मेहुणीचे लग्न ठरले होते. त्या लग्नाच्या खर्चाची जबाबदारी अमरजितकडे होती; पण मोलमजुरी करुन लग्नासाठी पैसे कसे जमवायचे, असा प्रश्न अमरजितला पडला होता. २३ एप्रिल रोजी तिचे लग्न होणार होते. लग्नाची तारीख जवळ येऊ लागली, तशी पैशांची चिंता अमरजितला झोपू देत नव्हती. त्यामुळे चोरी करुन पैसा मिळवायचा कट त्याने आखला. लग्नासाठी लागणारा पैसा कोणाकडे मिळेल, याची माहिती काढत असतानाच त्याची नजर घरमालक असलेल्या महादेव यांच्यावर पडली. महादेव वयोवृध्द असल्याने मध्यरात्री त्यांच्या घरात शिरुन जो पैसा मिळेल तो घेऊन गावी निघून जायचा कट अमरजितने रचला. घटनेच्या रात्री १२ वाजताच्या सुमारास अमरजित लाकडी दांडका घेऊन महादेव यांच्या घराकडे गेला. त्या रात्री महादेव अंगणात, तर त्यांची पत्नी घरात झोपली होती. त्यावेळी दबक्या आवाजाने घरात जाणाºया अमरजितला महादेव यांनी पाहिले. इतक्या रात्री अमरजितला आलेले पाहून, महादेव यांनी त्याच्या येण्याचे कारण विचारले. आता आपला चोरीचा कट उधळला जाईल, या भितीने अमरजितने महादेव यांना सोबत आणलेल्या लाकडी दांडक्याने मारण्यास सुरुवात केली. यावेळी झालेल्या झटापटीत अमरजितचे केस हातात आले. त्यामुळे त्याने दांडक्याचे टोक महादेव यांच्या डोळ्यात खूपसले. या हल्ल्यात महादेव यांचा मृत्यू झाला. त्यानंतर घरातील स्टीलच्या डब्ब्यात असलेले १६०० रुपये घेऊन अमरजितने तेथून पळ काढला.

आपल्यावर कुणाचा संशय येऊ नये, म्हणून अमरजित जवळच असलेल्या आपल्या सासूरवाडीत राहायला गेला. दुसºया दिवशी उत्तरप्रदेशातील मूळ गावी पळून जाण्याच्या तयारीत असतानाच कल्याण गुन्हे शाखेने अमरजितला पकडून खडकपाडा पोलिसांच्या ताब्यात दिले. चोरी करुन पळून जात असताना जंगलात फेकून दिलेला स्टीलचा डब्बा पोलिसांनी हस्तगत केला. त्याच्याजवळून चोरीची रोख रक्कमही हस्तगत केली. अमरजीत सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

Web Title: The brutal murder of the elderly homeowner for the marriage of sister-in-law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.