डोंबिवली : तुर्केमेनिस्तान येथे २३ एप्रिल ते २ मे दरम्यान झालेल्या एशियन किक बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत अक्षय गायकवाड याने ८१ किलोग्रॅमखालील वजनी गटात इव्हेंट फूल कॉन्टेक्ट प्रकारात भारताला कांस्यपदक मिळवून दिले आहे.पुण्यातील बालेवाडी येथे २४ मार्च ते २ एप्रिलदरम्यान झालेल्या इंटरनॅशनल कॅम्प स्पर्धेत अक्षयने सुवर्णपदक पटकावले होते. त्यामुळे त्याची निवड एशियन किक बॉक्सिंग चॅम्पियनशिपसाठी झाली. या स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय संघात विविध गटांतील ४० खेळाडू होते. या स्पर्धेसाठी तुर्केमेनिस्तान येथे जाण्यासाठी त्याला एक लाख २३ हजार रुपयांचा खर्च येणार होता. मात्र, तो त्याला परवडणार नव्हता. त्यामुळे त्याने आर्थिक मदतीसाठी महापालिकेतील विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच अक्षयला काही दानशूर व्यक्तींनी सढळ हस्ते मदत केली. मित्र परिवार आणि कुटुंबीय यांनीही त्याला सहकार्य केले. तसेच दुचाकी विकून त्याने काही रक्कम जमा केली.एशियन किक बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेतील क्वॉलिफाइड राउंडमध्ये अक्षयने सिरियाच्या खेळाडूवर मात करत पुढच्या फेरीत धडक मारली. मात्र, पुढील फेरीत त्याच्या विरोधातील स्पर्धक न आल्याने त्याला बाय मिळाला. सेमीफायनलमध्ये ख्रिझिकिस्तानच्या खेळाडूने त्याचा पराभव केला. त्यामुळे त्याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
अक्षय गायकवाडने मिळवले कांस्यपदक
By admin | Updated: May 9, 2017 00:53 IST