लोकमत न्यूज नेटवर्कमुरबाड : तालुक्यातील ओजिवले आणि दूधनोली येथील मोडकळीस आलेल्या पुलांच्या बांधकामासाठी परिसरातील नागरिकांनी आ. कथोरे यांच्याकडे मागणी केली होती. कथोरे यांनी तत्काळ ओजिवले पुलासाठी अडीच कोटी आणि दूधनोली पुलासाठी दोन कोटी मंजूर केले. ठेकेदाराने काम सुरूही केले. मात्र, तहसीलदारांच्या अडवणुकीमुळे सध्या हे काम ठप्प झाले आहे.तालुक्यातील धसई-उमरोली रस्त्यावरील ओजिवले येथील आणि म्हसा-वैशाखरे रस्त्यावरील दूधनोली येथील पूल मोडकळीस आला आहे. तसेच पावसाळ्यात तो पाण्याखाली जात असल्याने आ. किसन कथोरे यांच्या प्रयत्नाने तत्काळ दोन्ही पुलांना मंजुरी देण्यात येऊन हे काम पूल बांधकामासाठी प्रसिद्ध असलेल्या गजानन कन्स्ट्रक्शन या ठेकेदार कंपनीला देण्यात आले. या दोन्ही पुलांचे काम सुरू करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित कंपनीला परवानगी दिली आहे. तसेच बांधकामासाठी लागणारी खडी, रेती याची रॉयल्टी बांधकाम विभाग संबंधित ठेकेदार एजन्सीच्या बिलामधून कापून ती महसूल विभागाकडे परस्पर जमा करणार असल्याचे पत्र सा.बां. विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी मुरबाड तहसीलदारांना महिन्यापूर्वी पाठवले आहे. त्यामुळे ठेकेदारांना वाळू, खडी, सिमेंट वाहतुकीस लवकर परवानगी मिळावी. ज्यामुळे पावसाळ्यापूर्वी पूल वाहतुकीस खुला होऊन परिसरातील नागरिकांचा दळणवळणाचा प्रश्न सुटेल. परंतु, मुरबाड तहसीलदारांकडून वेळीच परवानगी मिळत नसल्याने ठेकेदाराने ओजिवले पुलाचे काम बंद केले आहे.या कामासाठी लागणाऱ्या सर्व शासकीय परवानग्या ठेकेदाराला देण्यात आल्या. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पत्राच्या आधारे तहसीलदारांनी ही परवानगी द्यायला हवी होती. मात्र, तहसीलदारांच्या अडवणुकीमुळे आणि पावसाळा तोंडावर आल्याने ठेकेदाराला नागरिकांच्या रोषाला सामोरे जाण्याची वेळ येणार आहे. त्यातच आता ठेकेदाराने रेती, खडी वाहतुकीची परवानगी मिळत नसल्याने दोन्ही पुलांचे बांधकाम बंद ठेवले आहे. तसा फलकही येथे लावला आहे.
तहसीलदारांच्या अडवणुकीमुळे पुलाचे काम रखडले
By admin | Updated: May 13, 2017 00:46 IST