कल्याण : केंद्र सरकारच्या ५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयाचे पडसाद सर्वत्र उमटत आहेत. कल्याणमधील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येही (एपीएमसी) बुधवारी हा परिणाम दिसून आला. या बाजारात माल खरेदी करण्यास आलेल्या ग्राहकांचा कल या नोटा वटवण्याकडेच होता. त्यामुळे एकवेळ माल उधार घेऊन जा, पण ५००आणि एक हजारच्या नोटा नकोत, अशी भूमिका व्यापाऱ्यांनी घेतली.प्रतिदिन कोट्यवधींची उलाढाल असलेल्या या एपीएमसीतील खरेदी-विक्रीलाही सरकारच्या निर्णयाचा फटका बसला आहे. होलसेल व्यापाऱ्यांकडे माल खरेदीसाठी आलेले किरकोळ व्यापारी आणि ग्राहक यांच्याकडून सर्रास ५०० आणि एक हजारच्या नोटा वटवण्याचा प्रयत्न झाल्याने सुट्या पैशांचीही चणचण निर्माण झाल्याचे चित्र बाजारात दिसत होते. ग्राहक तुटू नयेत, म्हणून उधारीवर माल देण्याचा पवित्रा व्यापाऱ्यांनी घेतला, तर दुसरीकडे ५०० आणि एक हजारच्या नोटा मात्र काही व्यापाऱ्यांनी सर्रासपणे नाकारल्या आहेत. ३० डिसेंबरपर्यंत या नोटा जमा करण्याची मुदत असल्याने व्यापाऱ्यांना या नोटा स्वीकारायला हरकत काय, असा सवाल फुले खरेदीसाठी आलेले डॉ. अजित पांपुटकर यांनी केला. तर, २० रुपयांच्या मालासाठीही ग्राहकांकडून ५०० रुपये काढले जात आहेत, याकडे विक्रेते तुषार भांडवलकर यांनी लक्ष वेधले. ग्राहकांचा कल ५०० व एक हजार नोटा खपवण्याकडे असल्याने सुट्या पैशांची चणचण भासत आहे, अस फुलविक्रे ते शशिकांत कदम आणि नवीन मौर्या यांनी सांगितले. सुटे पैसे आणण्यासाठी आग्रह धरल्याने ग्राहकांशी वाद होत असल्याचे नामदेव सैद म्हणाले. सरकारचा निर्णय चांगला आहे, परंतु व्यवहारात १०० च्या नोटा कमी पडत आहेत, असे विक्रेते अतुल धुमाळ यांनी सांगितले. सामान्य नागरिकाला कालबाह्य झालेल्या नोटा जमा करायला मुदतवाढ मिळावी, अशी अपेक्षा ग्राहक रूपेश होनराव यांनी व्यक्त केली. नोटा जमा करण्यासाठी ५० दिवस दिले आहेत. त्यामुळे आम्ही ग्राहक देत असलेल्या ५०० आणि एक हजारच्या नोटा स्वीकारत असल्याचे फळव्यापारी दया गुप्ता यांनी सांगितले.
माल उधार घेऊन जा, पण त्या नोटा नकोच!
By admin | Updated: November 10, 2016 03:24 IST