ठाणे : शहरातील बोगस डॉक्टरांना चाप लावण्यासाठी आणि कशाही पद्धतीने रक्त चाचण्या करुन चुकीचे रिपोर्ट देणाऱ्या पॅथ लॅबवर अंकुश आणण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. खाजगी दवाखाने असले तरी तिथे सेवा देणाऱ्या डॉक्टरांची डीग्री अधिकृत आहे की नाही, याची कोणतीही माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडे उपलब्ध नसते. शिवाय असंख्य पॅथॉलॉजी लॅबमध्येही अपुरे ज्ञान असलेले प्रयोगशाळा तंत्रज्ज्ञ रिपोर्ट तयार करत असतात. या सर्व गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी आता खाजगी रुग्णालयांच्या धर्तीवर खासगी डॉक्टर आणि पॅथोलॉजी लॅबची नोंदणीही सक्तीची केली जाणार आहे.शहरात कोण आणि कसा व्यवसाय करतो, याचा थांगपत्ताच सरकारी यंत्रणांना नाही. त्यामुळे त्यांची नोंदणी करण्याचा सरकार निर्णय दोन वर्षांपूर्वी झाला होता. काही महापालिकांनी त्याच्या अंमलबजावणीस सुरु वात केली असली तरी ठाण्यात मात्र अद्याप त्याबाबतच्या हालचाली झाल्या नव्हत्या. पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या आदेशानुसार सरकार निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय झाला असून त्याबाबतचा प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला आहे. शहरात झोपडपट्टी भागात अनेक ठिकाणी, बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट वाढला आहे. तसेच अनेक भागात खाजगी पॅथ लॅब सुरु असून त्यांच्याकडून रुग्णांची फसवणूक सुरु आहे. परंतु,आता यावर अंकुश बसविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार खाजगी प्रॅक्टिस करणाऱ्या प्रत्येक डॉक्टरने आपले नाव, वैद्यक परिषदेकडील नोंदणी क्र मांक, व्यवसायाचा पत्ता, मोबाइल क्र मांक, ई-मेल पत्ता आणि शैक्षणिक कागदपत्रांच्या प्रती, अशी माहिती पालिकेकडे देणे बंधनकारक केले जाणार आहे. यासाठी नामामात्र शुल्कही आकारले जाणार आहे. ही नोंदणी झाल्यानंतर त्यांची माहिती वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यामुळे अधिकृत आणि बोगस डॉक्टर ओळखणे सोईचे होईल. (प्रतिनिधी)
बोगस डॉक्टर,पॅथ लॅबवर पालिकेचा राहणार अंकूश
By admin | Updated: November 16, 2016 04:24 IST