- सदानंद नाईक उल्हासनगर - देशाच्या संरक्षणासाठी तैनात असलेले सैनिक देश रक्षणासाठी शहीद झालेल्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शनिवारी सायंकाळी भाजपाने तिरंगा यात्रा काढली. यात्रेत भाजपचे नेते, पदाधिकारी, नागरीक तसेच महायुतीतील नेते सहभागी झाले होते.
उल्हासनगर कॅम्प नं-३ येथील भाजपच्या जिल्हा कार्यालयापासून शनिवारी सायंकाळी तिरंगा यात्रा सुरू होऊन गोल मैदान, नेहरू चौक मार्गे पुन्हा जिल्हा कार्यालय येथे मिरवणुकीची सांगता झाली. यात्रेत आमदार कुमार आयलानी, जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया, माजी जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी, जमनु पुरस्वानी, मनोहर खेमचंदानी, प्रकाश माखीजा, डॉ. प्रकाश नथानी, राजू जग्यासी, मनोज साधनानी, अजितसिंह लबाना, राम चार्ली पारवानी, दीपक छतलानी, अमित वाधवा, लक्की नथानी, डॉ. एस. बी. सिंग यांच्यासह रिपाईचे शहराध्यक्ष नाना बागुल, शांताराम निकम यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शहरातून काढलेल्या तिरंगा यात्रेत सेवानिवृत्त सैनिकांना विशेष सन्मान देत त्यांना सर्वात पुढे ठेवण्यात आले होते. संपूर्ण मिरवणूक त्यांच्या मागे चालल्याचे चित्र होते. यात्रे बाबत सर्वसामान्य नागरिकांत उत्साह दिसून आला असून यात्रेतील तरुणांनी पाकिस्तानविरोधात जोरदार घोषणा केल्या. आमदार कुमार आयलानी, शहरजिल्हाध्यक्ष राजेश वधारिया यांनी यावेळी मार्गदर्शन केले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले आणि देशातील सैनिकांप्रती आपला आदर व्यक्त केला.