पंकज पाटील, अंबरनाथस्थानिक स्वराज्य संस्थेतून निवडून दिल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या जागेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीतर्फे वसंत डावखरे यांची उमेदवारी जाहीर होऊनही शिवसेनेने अद्याप उमेदवार दिलेला नाही. शिवसेनेतील स्पर्धा तीव्र असताना डावखरे यांनी इतर पक्षांतील नगरसेवकांना, राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपामध्ये गेलेल्यांना, शिवसेनेसह अन्य पक्षांतील ‘मित्रांना’ गळाला लावण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. युतीच्या सदस्यांची संख्या आघाडीपेक्षा जास्त असली, तरी युतीचा मित्र पक्ष असलेल्या भाजपाच्या गटातील नगरसेवकांना आपल्याकडे ओढण्याचे जोरदार प्रयत्न डावखरे यांच्यामार्फत सुरू आहेत. तसेच जे राष्ट्रवादीतून भाजपात प्रवेश करून नगरसेवक झाले आहेत, तेदेखील छुप्या पद्धतीने डावखरे यांचाच प्रचार करताना दिसत आहेत. भाजपातील ‘राष्ट्रवादी’ ही डावखरेंच्या बाजूने प्रचार करीत असल्याने शिवसेनेवर मोठी कसरत करण्याची वेळ येणार आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत भाजपाला मिळालेल्या जनाधाराचा विचार करून अनेक लोकप्रतिनिधींनी पक्षांतर करीत भाजपात प्रवेश केला होता. विधानसभा निवडणुकीवेळी याचे पेव फुटले होते. तसेच विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या नगरपालिका निवडणुकीतही राष्ट्रवादीतील अनेक पदाधिकारी आणि नगरसेवक हे भाजपात गेले. निवडणुकीत विजय मिळवण्याचा एकमेव हेतू ठेवून हे लोकप्रतिनिधी भाजपावासी झाले. प्रत्यक्षात भाजपात असले तरी या लोकप्रतिनिधींची राष्ट्रवादीसोबतची जवळीक सुटत नाही. याचा प्रत्यय वसंत डावखरे यांच्या निवडणुकीच्या निमित्ताने येतो आहे. आघाडीने आपले नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्यांना संघटित राहण्याचे आवाहन केले आहे. ते डावखरेंच्या प्रचारात व्यस्तही झाले आहेत. मात्र, डावखरे यांना विजयासाठी युतीच्या मतांचा आधार घ्यावा लागणार असल्याने त्यांनी सर्वात आधी भाजपावर लक्ष केंद्रित केले आहे. शिवसेनेने आपला उमेदवार रिंगणात उतरवल्यावर मतदार क्रॉस व्होटिंग करणार नाहीत, याची काळजी घेतली जाणार आहे. शिवसेनेचा उमेदवार जरी महायुतीचा असला, तरी वेगवेगळ्या कारणांवरून दोन्ही पक्षांत सुरू असलेली धुसफूस मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे भाजपा सरसकट सर्व ठिकाणी सहजासहजी शिवसेनेला मतदान करणार नाही, याची चाचपणी डावखरे यांनी केली आहे. त्यामुळे भाजपाच्या नगरसेवकांना आपल्या बाजूने मतदान करण्यासाठी ते प्रोत्साहन देत आहेत. ‘युतीचा धर्म पाळा’ असे आदेश भाजपाकडून आल्यावरही मतदान कोणाला करावे, हा प्रश्न नगरसेवकांपुरता मर्यादित असल्याने गुप्त मतदानाचा फायदा उचलण्याचा प्रयत्न डावखरे करीत आहेत. शिवसेना उमेदवार ठरवण्याच्या प्रयत्नात असताना भाजपा नगरसेवकांच्या संपर्कात राहून डावखरे मतदानाचे आकडे बदलण्याचा प्रयत्न करीत आहेत. भाजपात जे नेते आणि लोकप्रतिनिधी आहेत, त्यातील बहुसंख्य राष्ट्रवादीतून आणि काँग्रेसमधून गेलेले आहेत. डावखरे यांच्यासोबत त्यांचे चांगले संबंध आहेत.
भाजपातील ‘राष्ट्रवादी’ला डावखरेंचा मोह
By admin | Updated: May 15, 2016 03:51 IST