उड्डाणपुलाचे भाजपकडून लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2020 01:14 AM2020-09-20T01:14:22+5:302020-09-20T01:14:35+5:30

भिवंडीमध्ये श्रेयवादाची लढाई। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सोमवारी आॅनलाइन उद्घाटन

BJP dedicates flyover | उड्डाणपुलाचे भाजपकडून लोकार्पण

उड्डाणपुलाचे भाजपकडून लोकार्पण

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी : शहरातील वाहतुकीची वर्दळ वाढलेली असताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर करून भूमिपूजन केलेल्या कल्याण नाका ते साईबाबा या रस्त्यावरील उड्डाणपूल पूर्ण झाला असताना उद्घाटनावरून शिवसेना-भाजप या पक्षांत श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे.
सोमवारी या उड्डाणपुलाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आॅनलाइन लोकार्पण करणार होते; मात्र शनिवारी भाजप आमदार महेश चौघुले व शहराध्यक्ष संतोष शेट्टी यांनी उद्घाटन करीत वाहतुकीसाठी पूल खुला केला. शहरातील या उड्डाणपुलाच्या उभारणीसाठी आम्ही मागणी करीत असताना फडणवीस यांचे योगदान मोठे असून त्यांनी या उड्डाणपुलास मंजुरी देऊन भूमिपूजन केले होते. असे असताना स्थानिक आमदारांना डावलून एमएमआरडीए या पुलाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री यांच्या हस्ते आॅनलाइन करणार आहे. कोरोनाकाळात बाहेर न पडलेले मुख्यमंत्री यांना दीड महिन्यापासून तयार असलेल्या उड्डाणपुलाच्या उद्घाटनासाठी वेळ मिळाला नाही. त्यामुळे येथील नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. कोरोनासाठी वेळ नसलेल्या मुख्यमंत्र्यांना लोकार्पणासाठीही वेळ मिळू शकला नसल्याने आम्ही उड्डाणपुलाचे लोकार्पण केले. महाविकास आघाडी सरकार जाणूनबुजून नागरिकांना वेठीस धरत असल्याचा आरोप आमदार चौघुले यांनी केला आहे.
दरम्यान, हा पूल सुरुवातीपासूनच श्रेयवादाने वादग्रस्त ठरला असून, याच्या भूमिपूजन सोहळ्यावर शिवसेनेने बहिष्कार घातला होता. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी या उड्डाणपुलावरील एक मार्गिका सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू करताच त्याची कुणकुण लागताच शिवसेनेचे माजी आमदार रूपेश म्हात्रे यांनी या पुलाचे लोकार्पण करून श्रेय घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर शनिवारी भाजपने या पुलाचे लोकार्पण करून या उड्डाणपुलाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला आहे.

खरे श्रेय फडणवीस
यांना - संतोष शेट्टी
फडणवीस मुख्यमंत्री असताना प्रथमच भिवंडीच्या विकासासाठी कोट्यवधी रुपये मंजूर केले; परंतु त्यातील सुरू असलेल्या कामांना शिवसेना सरकार स्थगिती देऊन भिवंडीच्या नागरिकांवर अन्याय करीत असल्याने या उड्डाणपुलाचे खरे श्रेय माजी मुख्यमंत्री फडणवीस यांचे असल्याने भाजपने लोकार्पण केले, अशी प्रतिक्रिया शहर अध्यक्ष संतोष शेट्टी यांनी दिली.

Web Title: BJP dedicates flyover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.