पंकज पाटील / उल्हासनगरउल्हासनगर शहरात प्रचारासाठी कोणता फंडा वापरला जाईल, याचा नेम नाही. त्याचा अनुभव प्रभाग क्रमांक ९ (अ) मध्ये येतो आहे. हा प्रभाग महिला उमेदवारासाठी राखीव असतानाही तेथील प्रभागात पुरुष उमेदवाराचा फोटो वापरून मते मागण्याचे काम सुरू असल्याने मतदार गोंधळले आहेत.उल्हासनगरमधील प्रभाग क्रमांक ९ मध्ये अ, ब आणि क अशा तीन वॉर्डांचा समावेश आहे. त्यातील ९ (अ) महिला उमेदवारासाठी राखीव आहे. या प्रभागात तीन उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे. येथे भाजपाचे उमेदवार म्हणून नरेंद्र ठाकूर यांचा फोटो आणि नावाचा वापर केला जात आहे. वस्तुत: येथे नरेंद्रकुमार ठाकूर यांची मुलगी डिम्पल हिने अर्ज भरला आहे. उमेदवारीसाठी मुलीचा वापर केला असला, तरी प्रत्यक्षात प्रचारासाठी कोठेही तिचा फोटो आणि नाव न वापरता नरेंद्र यांनी आपला फोटो आणि नावाचा वापर सुरू केला आहे. वडीलच मुलीला प्रचारापासून दूर ठेवत स्वत:चा चेहरा आणि नावाचा वापर करून प्रचार करीत आहेत. प्रभागात आपलीच ओळख कायम राहावी, असा प्रयत्न करत आहेत. प्रभागात आणि जनसंपर्क कार्यालयात लावण्यात आलेल्या बॅनरवर कोठेही डिम्पल यांचा फोटो नाही. जेथे उमेदवार म्हणून मुलीचे नाव वापरणे गरजेचे होते, तेथेही नरेंद्र यांचाच फोटो आहे. नावातही डिम्पलमधील ‘डी’ या पहिल्या शब्दाचा वापर आपल्या नावापुढे करत त्यांनी ‘डी. नरेंद्र ठाकूर’ असा उल्लेख केला आहे आणि याच नावावर ते प्रभागात सर्वत्र प्रचार करीत आहेत. त्यामुळे महिलांच्या प्रभागातील ही पुरुषाची घुसखोरी चर्चेचा विषय बनली आहे. पक्षानेही नरेंद्र यांच्याच लोकप्रियतेवर भर दिल्याने महिलांच्या सक्षमीकरणाची भाषा करणाऱ्या नेत्यांनी मौन बाळगले आहे. सर्वत्र नरेंद्र यांचाच उल्लेख होत असल्याने डिम्पल यांची उमेदवारी वडिलांना आणि पक्षाला कमीपणाची वाटते की काय, असा प्रश्न विचारला जात आहे. (प्रतिनिधी)
महिला प्रभागात भाजपाचा पुरुष उमेदवार?
By admin | Updated: February 13, 2017 05:00 IST