भिवंडी : "वंचित बहुजन आघाडी संघटना जास्तीत जास्त मजबूत करण्यासाठी राज्यभर ठिकठिकाणी वंचितच्या वतीने युवा जोडो अभियान कार्यक्रम राबविण्यात येत आहे. तरुण युवकांना वंचित आघाडीत सामील करून त्यांना राजकारण व सामाजिक कार्याचे धडे देऊन भविष्यात लोकोपयोगी कार्यकर्ता तयार करण्याचा प्रयत्न असून त्याद्वारे वंचितचे संघटन अधिकाधिक मजबूत करणार आहोत, त्याचबरोबर आगामी भिवंडी मनपा निवडणुकीत वंचित मोठ्या ताकदीनिशी निवडणुकीत उतरणार आहोत," अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांनी भिवंडीत शुक्रवारी युवा मेळावा कर्यक्रमाप्रसंगी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे. वंचित बहुजन आघाडीच्याठाणे जिल्ह्याच्यावतीने अशोक नगर येथील मंगलमूर्ती हॉल येथे युवा संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वंचितचे राज्य महासचिव राजेंद्र पातुडे, ठाणे जिल्हाध्यक्ष सुनील भगत यांच्यासह वंचितचे ठाणे भिवंडी व परिसरातील कार्यकर्ते व युवक मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.
मुंबई ठाणे या शहरांपासून अगदी नजीक असलेल्या भिवंडी शहराची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून अवघ्या चार नगरसेवक असलेल्या कोणार्ककडे महापौर पद असल्याने वंचितचे प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांनी आश्चर्य व्यक्त करत अशा प्रकारच्या राजकारणात फक्त आर्थिक गणित पहिले जाते शहर विकासाकडे मात्र दुर्लक्ष होते तीच परिस्थिती भिवंडी शहराची झाली असून आगामी भिवंडी मनपा निवडणुकीत वंचित पौरण ताकदीनिशी उतरणार असून वंचितचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्याचा प्रयत्न असणार आहे.
येथील रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाली असून शहराच्या विकासाची ब्लू प्रिंट येथील राजकीय नेते पुढाऱ्यांकडे नाही किंबहुना त्यासाठी कोणीही प्रयत्न करत नाही हे फार दुर्दैव आहे अशी प्रतिक्रिया देखील यावेळी विश्वकर्मा यांनी दिली. तर सध्या युवकांचे आकर्षण वंचित आघाडीकडे असल्याने जास्तीत जास्त युवक सध्या वंचित आघाडीत सामील होत आहेत, आगामी काळात ठाणे जिल्ह्यात वंचित आपला चांगला दबदबा निर्माण करेल अशी आशा यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील भगत यांनी व्यक्त केली.