मीरा रोड : मीरा-भार्इंदर महापालिकेचे पर्यावरणप्रेम बेगडी असल्याचे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. पर्यावरणसंवर्धनासाठी सरकारच्या वृक्षलागवड अभियानांतर्गत शहरात २५ हजार झाडे लावण्याचा उदोउदो करणाऱ्या पालिकेने खरेदी केलेली काही रोपे व पिंजरे सात महिने झाले, तरी भार्इंदर पोलीस ठाण्याच्या आवारात पडून आहेत. रोपे मरून गेली असून पिंजऱ्यांचा वापर आता कपडे सुकवण्यासाठी होऊ लागला आहे. सरकारने गेल्या वर्षी पर्यावरणाचे संवर्धन व्हावे, म्हणून २ कोटी झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेतला होता. मीरा-भार्इंदर महापालिकेनेही शहरात २५ हजार झाडे लावण्याची घोषणा केली. लाखो रुपये खर्च करून रोपे, लोखंडी पिंजरे, माती, शेणखत खरेदी करण्यात आले. त्या वेळी भार्इंदर पोलीस ठाण्याच्या आवारात पालिका उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे, तत्कालीन वरिष्ठ निरीक्षक अनिल कदम यांनी पालिका व पोलीस कर्मचाऱ्यांसह रोपांची लागवड करतानाची प्रसन्नमुद्रेने छायाचित्रे काढून घेतली. पण, पालिकेने देखभाल न केल्याने त्या वेळी लावलेल्या रोपांपैकी काही रोपे जगली नाहीत, तर काही रोपे लागवड न करताच ती उघड्यावर ठेवल्याने मरून गेली. रोपांच्या संरक्षणासाठी आणलेले पिंजरेही पडून होते. याबाबत, गेल्या वर्षी आॅगस्टमध्येच ही बाब ‘लोकमत’ने पालिकेच्या निदर्शनास आणून दिली होती. तब्बल सात महिने झाले, तरी आजही रोपे मृतावस्थेत तशीच पडून आहेत. लोखंडी जाळ्यांच्या पिंजऱ्यांचा वापर नागरिक आता कपडे सुकवण्यासाठी सर्रास करू लागले आहे. (प्रतिनिधी)
भार्इंदर पालिकेचे बेगडी पर्यावरणप्रेम
By admin | Updated: February 13, 2017 04:41 IST