ठाणे : स्वच्छ भारत मिशन अभियानांतर्गत प्रत्येक घरात शौचालय असावे, या उद्देशाने ठाणे महापालिकेने झोपडपट्टी भागातील १ लाख १२ हजार २३८ घरांचा सर्व्हे केला असून त्यातील ७० हजार २५८ घरे ही शौचालयांचा वापर करीत नाहीत. त्यामुळे आता वैयक्तिक शौचालयांच्या उभारणीसाठी केंद्राने २ कोटी ६९ लाखांचा निधी दिला असून त्यासाठी ठेकेदाराची नियुक्ती केली जाणार नाही ते लाभार्थ्यानेच उभारावे, असे निश्चित करण्यात आल्याचे महापालिका आयुक्त संजीव जैस्वाल यांनी स्पष्ट केले.ठाणे महापालिकेच्या घनकचरा विभागामार्फत जून महिन्यात हा सर्व्हे सुरू झाला होता. त्यानुसार, आता प्रत्येक प्रभाग समितीमधील सर्व्हे १०० टक्के पूर्ण झाला आहे.शौचालय उभारण्यासाठी केंद्र शासनाकडून ४ हजार आणि राज्य शासनाकडून ८ हजारांचे अनुदान आधारकार्ड संलग्न असलेल्या संबंधित व्यक्तीच्या बँक खात्यात जमा होणार आहे. परंतु, हा भरणा दोन टप्प्यांत केला जाणार असून पहिल्या टप्प्यात शौचालयाचे अर्धे काम केले जाणे आवश्यक असून त्यानुसारच दुसऱ्या टप्प्याचा निधी दिला जाणार आहे. ज्यांच्याकडे शौचालये नाहीत, त्यांना ते बांधण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे. या योजनेत भ्रष्टाचार टाळण्यासाठी ठेकेदारांना काम न देता ते लाभार्थ्याकडूनच करवून घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला असल्याचे समजते. (प्रतिनिधी)१ लाख १२ हजार २३८ बैठ्या घरांचे सर्वेक्षण पूर्ण केले असून त्यातील ४१ हजार ७८० घरांमध्ये शौचालय आहे. तर, ७० हजार ७८० घरांमध्ये शौचालये नाहीत. पैकी ३०९२ घरे ही सामूहिक शौचालयांचा वापर करीत असून उर्वरित ६० हजार १९८ घरे ही सार्वजनिक शौचालयांचा वापर करीत आहेत. त्यांच्यासाठी स्वतंत्र शौचालये झाल्यावर सार्वजनिक व सामूहिक शौचालयावरील ताण कमी होईल.आता ठाणे महापालिका या कुटुंबांसाठी ज्या पद्धतीने जागा उपलब्ध असेल, त्यानुसार वैयक्तिक, सामूहिक अथवा सार्वजनिक शौचालये उपलब्ध करून देणार आहे. दरम्यान, त्यानुसार आता पहिल्या टप्प्यात वैयक्तिक शौचालय उभारणीसाठी केंद्राने २ कोटी ६९ लाखांचा निधी दिला असून यामध्ये पालिकाही आपला हिस्सा देणार आहे. शौचालय उभारणीसाठी ठेकेदार अथवा निविदा काढल्या जाणार नसून लाभार्थ्यानेच शौचालय उभारावे, हे निश्चित करण्यात आल्याची माहिती आयुक्तांनी दिली.
वैयक्तिक शौचालयांची बांधणी लाभार्थ्याकडूनच
By admin | Updated: October 6, 2015 00:37 IST