केडीएमटीच्या आगाराला ठोकले टाळे; परिवहन सभापतींचीही मध्यस्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 12:43 AM2019-09-10T00:43:26+5:302019-09-10T00:43:40+5:30

गणेशोत्सवामुळे चक्काजाम आंदोलन तूर्तास स्थगित

Avoid KDMT Deployment; Mediation of transport chairmen too | केडीएमटीच्या आगाराला ठोकले टाळे; परिवहन सभापतींचीही मध्यस्थी

केडीएमटीच्या आगाराला ठोकले टाळे; परिवहन सभापतींचीही मध्यस्थी

Next

कल्याण : वेतनवाढ, रखडलेली पदोन्नती आदी मागण्यांसंदर्भात केडीएमटीतील कल्याण-डोंबिवली महानगरपालिका परिवहन मजदूर युनियनने सोमवारी येथील गणेशघाट आगारातील प्रवेशद्वाराला टाळे ठोकत आंदोलन सुरू केले होते. परंतु, गणेशोत्सव सुरू असून प्रवाशांना वेठीला धरू नका. लवकरच मागण्यांबाबत तोडगा काढला जाईल, असे आश्वासन व्यवस्थापक मारुती खोडके यांनी दिले. तर, परिवहन सभापती मनोज चौधरी यांनीही केलेली मध्यस्थी यशस्वी ठरल्याने चक्काजाम आंदोलन तूर्तास सात दिवसांसाठी स्थगित करण्याचा निर्णय युनियनने घेतला. दरम्यान, आयुक्त युनियनशी चर्चा करणार होते. मात्र चर्चा झाली नाही. त्यामुळे आंदोलन केले खरे, पण व्यवस्थापनाच्या मदतीला गणपती बाप्पा धावून आल्याची चर्चा रंगली होती.

प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेला केडीएमसीच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे केडीएमटीच्या कर्मचाऱ्यांनाही वेतन मिळावे, पाचव्या व सहाव्या वेतन आयोगापोटी मिळणारी थकबाकी एकरकमी द्यावी, १८ टक्के महागाईभत्ता त्वरित लागू करावा, २० वर्षांपासून रखडलेली पदोन्नती सेवाज्येष्ठतेनुसार द्यावी, केडीएमसीला राज्य सरकारच्या आदेशाप्रमाणे ज्यावेळेस सातवा वेतन आयोग लागू होईल, त्याचवेळेस परिवहन उपक्रमाच्या कर्मचाºयांनाही लागू व्हावा, आदी मागण्या युनियनच्या होत्या. मात्र, व्यवस्थापनाने युनियनला पत्र देऊन चक्कजाम आंदोलन न करण्याची विनंती केली होती.

दुसरीकडे आयुक्त गोविंद बोडके यांच्याशी होणाºया चर्चेनंतरच चक्काजाम आंदोलन करायचे की नाही, याचा निर्णय घेतला जाईल, अशी भूमिका युनियनचे अध्यक्ष अरविंद मोरे यांनी घेतली होती. रविवारपर्यंत मागण्या पूर्ण करण्याची मुदत दिली होती, पण ती पाळण्यात आली नाही. त्यात बोडके यांची भेटही घडली नाही. यामुळे आक्रमक झालेल्या मोरे यांनी कर्मचाºयांसह गणेशघाट आगाराच्या प्रवेशद्वाराला टाळे ठोकत चक्काजाम आंदोलन सुरू केले. आंदोलन सुरू झाल्याची माहिती मिळताच खोडके आणि चौधरी यांनी मोरे यांना संपर्क साधत चर्चेला बोलावले. गणेशोत्सव चालू असून तूर्तास आंदोलन स्थगित करावे. लवकरच आयुक्तांच्या उपस्थितीत चर्चा करून मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन खोडके आणि चौधरी यांनी दिले. यावर सात दिवसांचा अल्टीमेटम देत असल्याचे सांगत गणेशोत्सवानंतर ठोस कार्यवाही न झाल्यास आंदोलन अटळ असेल, असा इशारा मोरे यांनी दिला. दरम्यान, चर्चेनंतर चौधरी यांनी गणेशघाट आगाराला भेट देत आंदोलनकर्त्यांना चक्काजाम मागे घेण्याची विनंती केली. यावर तीन तास सुरू असलेले आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले.

...तर जागेवरच बस थांबवल्या जातील
व्यवस्थापक आणि सभापतींच्या विनंतीनंतर चक्काजाम आंदोलन तूर्तास स्थगित करीत आहोत. पण, पाच दिवसांनंतर काही निर्णय न झाल्यास जेथे बस रस्त्यावर असतील, तिथेच त्या थांबवून चक्काजाम आंदोलन केले जाईल. तसेच वाहतूककोंडीला केडीएमसीचे आयुक्त गोविंद बोडके हे जबाबदार राहतील, असे मोरे म्हणाले. तसेच परिवहनला सहकार्य न करणाºया आयुक्तांची हकालपट्टी व्हायला हवी, अशीही मागणी त्यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही परिवहनच्या प्रलंबित मागण्यांबाबत पत्र दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Avoid KDMT Deployment; Mediation of transport chairmen too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.