मुरबाड : काेराेनाचे संशयित रुग्ण तत्काळ आपली ॲंटिजेन चाचणी करतात, मात्र त्यांचे रिपाेर्ट देण्यात आराेग्य यंत्रणेकडून माेठ्या प्रमाणावर उशीर हाेत आहे. हे रिपाेर्ट मिळण्यात सुमारे तीन ते चार दिवस लागत असल्यामुळे काहीच लक्षणे नसलेले संशयित लग्नसाेहळे, साखरपुडा आणि विविध कार्यक्रमांना हजेरी लावत असल्यामुळे त्यांच्यापासून संसर्गाचा धाेका वाढला आहे. त्यामुळे आराेग्य यंत्रणेच्या या ढिलाईबाबत नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत.
कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत़ तर आराेग्य यंत्रणा ताेकडी पडत आहे. खाटा, औषधे आणि ऑक्सिजन यांच्या तुटवड्यामुळे यंत्रणा काेलमडली आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्वच प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. मात्र, आरोग्य यंत्रणेकडून दररोज घेण्यात येणारी ॲंटिजेन चाचणीचे रिपोर्ट हे तत्काळ मिळत नसल्यामुळे ते तीन ते चार दिवसांत उपलब्ध होतात.
त्यामुळे चाचणी करणारा इसम हा खुलेआम विविध कार्यक्रमात सहभागी होऊन शेकडो नागरिकांना संक्रमित करत आहे. आरोग्य विभाग दररोज ज्या रुग्णांची ॲंटिजेन चाचणी करत आहे. त्यांच्या हातावर क्वारंटाइन शिक्का मारणे किंवा त्याला वेगळ्या रंगाचा मास्क वापरण्याची सक्ती करणे असे केल्यास संक्रमणाचा धाेका कमी हाेऊ शकेल.
...
बाधित रुग्णांच्या हातावर क्वारंटाइनचा शिक्का मारण्याचे व त्यांना विशिष्ट रंगाचा मास्क देणे हे योग्य ठरेल व त्यामुळे कोरोनाची साखळी खंडित होईल. परंतु तसे आरोग्य विभागाला आदेश नाहीत. स्थानिक स्वराज्य संस्था यावर उपाययोजना करू शकतात.
- डाॅ. श्रीधर बनसोडे, तालुका आरोग्य अधिकारी, पंचायत समिती, मुरबाड