राज्यस्तरावर जव्हार तालुक्यातील नाचणी पिकाचा अभ्यास अव्वल

By प्रज्ञा म्हात्रे | Published: December 8, 2022 05:08 PM2022-12-08T17:08:57+5:302022-12-08T17:09:33+5:30

कनिष्ठ गटातून सरस्वती सेकंडरी स्कूलचा प्रकल्प सर्वोत्कृष्ट

At the state level, the study of ragi crop in Jawhar taluka is top | राज्यस्तरावर जव्हार तालुक्यातील नाचणी पिकाचा अभ्यास अव्वल

राज्यस्तरावर जव्हार तालुक्यातील नाचणी पिकाचा अभ्यास अव्वल

Next

प्रज्ञा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: राज्यस्तरीय बाल विज्ञान परिषदेत वरिष्ठ गटातून जव्हारच्या श्री जयेश्वर विद्या मंदिर, डेंगाचीमेट तर कनिष्ठ गटातून ठाण्याचा सरस्वती सेकंडरी स्कूलचा प्रकल्प सर्वोत्कृष्ट ठरला. या दोन्ही प्रकल्पांना जानेवारी महिन्यात नागपूर येथे होणाऱ्या १०८ व्या इंडियन सायन्स काँग्रेस या ज्येष्ठ वैज्ञानिकांच्या परिषदेत आपला प्रकल्प सादर करण्याची संधी मिळणार आहे.

३ व ४ डिसेंबर रोजी संपन्न झालेल्या ठाण्याच्या ३० वी राज्य स्तरीय बाल विज्ञान परिषोत संपूर्ण महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यातील तीन हजारांहून अधिक प्रकल्पाची नोंदणी जिल्हा पातळीवर झाली होती. त्यातील २६४ निवडक प्रकल्प राज्य स्तरावर सादर झाले होते. ४५ तज्ञ व्यक्तींनी या प्रकल्पांचे परिक्षण केले. राज्यस्तरावर पालघर जिल्ह्यातील श्री जयेश्वर विद्या मंदिरने ‘नाचणी पिकाचा अन्नधान्य म्हणून अभ्यास’ हा प्रकल्प प्रतिमा भोये आणि रोहित कोती या विद्यार्थ्यांनी सादर केला.

या प्रकल्पाला सुप्रिया वागळे यांनी मार्गदर्शन केले. ठाणे शहरातील सरस्वती सेकंडरी स्कूलचे विरजीत फुंडे आणि निविदा पगार यांनी इकोफ्रेंडली मार्कर पेन हा प्रकल्प सादर केला. या प्रकल्पाला शिक्षिका संगीता कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. राज्यस्तरावर सादर झालेल्या प्रकल्पातून ३० प्रकल्प हे राष्ट्रीय पातळीवर निवडले गेले. यामध्ये सर्वाधिक सात प्रकल्प हे ठाणे जिल्ह्यातील आहेत.

मुंबई ४, पुणे ४, पालघर २, सिंधुदुर्ग २, कोल्हापूर २, नंदुरबार २, अमरावती, अहमदनगर, चंद्रपूर, धुळे, उस्मानाबाद, रायगड, सोलापूर प्रत्येकी १ असे १४ जिल्ह्यातील ३० प्रकल्प हे राष्ट्रीय पातळीवर सादर करण्यासाठी निवडले गेले आहेत. ठाण्याच्या सरस्वती सेकंडरी स्कूलच्या सर्वाधिक तीन प्रकल्पांची निवड राष्ट्रीय पातळीवर झाली आहे.

१९९५ सालापासून ठाणे जिल्हा हा राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेत सहभागी होत आहे आणि हे वर्ष ही यंदा अपवाद नाही. यंदा पालघर जिल्ह्यातून प्रकल्प निवडला गेला आहे. भावी शास्त्रज्ञ हे ग्रामीण भागातून नक्कीच मिळतील. - सुरेंद्र दिघे, अध्यक्ष, बालविज्ञान परिषद

राष्ट्रीय स्तरावर निवडलेले जिल्ह्यातील सात प्रकल्प

  • सरस्वती सेकंडरी स्कूल (३ प्रकल्प)- इकोफ्रेंडली मार्कर पेन / शाश्वत गतीचे विद्युत ऊर्जेचे रुपतांर करणाऱ्या यंत्राची रचना / प्लांट फायबर इज द न्यू प्लास्टिक
  • नवी मुंबई महापालिका शाळा क्र. ५३, ऐरोली- अपघात रक्षक टोपी
  • श्रीमती सुलोचनादेवी सिंघानिया स्कूल, ठाणे- समजूया झाडांचे शास्त्र, सोडवूया तणाचे रहस्य
  • डॉ. बेडेकर विद्या मंदिर- घरपोच अन्नपदार्थांसाठी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक कंटेनरला पर्यायी व्यवस्था
  • श्रीरंग विद्यालय इंग्रजी माध्यम स्कूल- झुरळांचे मानवी आरोग्य व स्वास्थायवर होणारे दुष्परिणाम व त्यावरील नियंत्रणाचे उपाय

Web Title: At the state level, the study of ragi crop in Jawhar taluka is top

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.