संदीप प्रधानसहयाेगी संपादक
ठाण्यातील घोडबंदर रोडचा परिसर हा मूळ ठाण्याशी नाते सांगत नाही. येथील रहिवासी स्वत:ला मुंबईकर समजतो. काही नाही तर ‘अप्पर ठाणेकर’ असल्याचा दावा करतो. येथील टॉवरमधील फ्लॅटमध्ये स्वर्गसुख आहे. पण स्वर्ग गाठायचा तर यातना सहन कराव्या लागतात. त्या घोडबंदरवासीय वर्षानुवर्षे सहन करत असल्यानेच या भागात मागील पंधरा दिवसांत खड्डे, वाहतूककोंडी याकरिता तीन आंदोलने झाली. महापालिकेच्या नावाने रहिवाशांनी शीर्षासन केले. येणाऱ्या महापालिका निवडणुकीत घोडबंदरवर कब्जा करण्याकरिता भाजप व शिंदेसेना यांच्यात चुरस सुरू आहे. त्यामुळे वेगवेगळ्या कारणांवरून या भागातील रहिवाशांत असलेल्या असंतोषाला राजकीय खतपाणी घालण्याचे काम सुरू आहे.
घोडबंदर रोडवर अगदी कोपऱ्यात, अडचणीच्या ठिकाणी फ्लॅट खरेदी करायचा तरी किमान ६० लाख रुपये हवे. मोक्याच्या ठिकाणच्या टॉवरमध्ये फ्लॅट खरेदी करण्याकरिता सव्वा ते दीड कोटी रुपयेसुद्धा लागतात. येथील रहिवासी झाल्यावर किमान पाच हजार ते महिनाकाठी दहा हजारांपर्यंत मेंटेनन्स देण्याची तुमची क्षमता हवी. अनेक टॉवरमध्ये पुरेसा पाणीपुरवठा नाही. त्यामुळे पिण्याचे व आंघोळीचे पाणी टँकरने पुरवले जाते. एकाच वेळी दोन टँकर मागवायचे तर आठ ते दहा हजार रुपये खर्च येतो.
या भागात राहायचे तर तुमच्याकडे किमान एक मोटार हवी. म्हणजे दरमहा इंधन, मेंटेनन्स, ड्रायव्हर वगैरे खर्च २५ ते ४० हजारांच्या घरात येतो. खरे तर घोडबंदरला राहण्यापेक्षा डोंबिवलीला राहणे तुलनेने स्वस्त व लोकलने जलद प्रवास करणारे आहे. परंतु डोंबिवलीला राहतो म्हणजे गावात राहतो आणि घोडबंदरला राहतो म्हणजे ठाण्यात ढेंगभर अंतरावर राहतो, असे पर्सेप्शन घोडबंदर विकसित होत असताना बिल्डर, स्थानिक राजकीय नेते यांनी करून दिले. प्रत्यक्षात सकाळी व सायंकाळी जेव्हा तासभर कोंडीत अडकावे लागते तेव्हा येथील रहिवाशांना ‘वरलिया रंगाला’ भुलल्याचा साक्षात्कार होतो. भरपूर पैसे खर्च करूनही मानसिक सुखाच्या अभावामुळे या भागात असंतोष आहे. आता त्याला खतपाणी घालण्याचे काम भाजपची मंडळी करीत आहेत.
ठाणे शहरातील भाजपचे आ. संजय केळकर यांनी घोडबंदर रोडवरील काही सोसायट्यांत बैठका घेतल्या. येथील कोंडी कमी करण्याकरिता परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सेवा रस्ते मूळ रस्त्यात मिसळण्याची उपाययोजना काढली. मात्र याला काही रहिवाशांचा विरोध आहे. यामुळे आमच्या दारातून वेगात वाहने जाऊन अपघात वाढतील, असे रहिवाशांना वाटते. सेवा रस्ते मुख्य रस्त्यात मिसळायचे तर विजेच्या खांबापासून सार्वजनिक शौचालयांपर्यंत असंख्य अडथळे आहेत. सरकारच्या वेगवेगळ्या विभागांत समन्वय नाही. त्यामुळे निर्णय अमलात आणणे कठीण झालेय. त्यातच सरनाईक यांनी नातवाला शाळेत जाण्याकरिता टेस्ला खरेदी केली. घोडबंदर रोडवरील हा लब्धप्रतिष्ठित वर्ग विचारांनी गेल्या दहा वर्षांत भाजपकडे झुकलेला असताना टेस्लाने भाजपला शिंदेसेनेच्या विरोधात नॅरेटिव्ह सेट करण्याची संधी चालून आली. त्यामुळे घोडबंदरच्या आंदोलनात रहिवाशांनी ‘नेत्याने घेतली टेस्ला, घोडबंदरवासीय फसला’, अशा घोषणा दिल्या.
घोडबंदर रोड पट्ट्यातून २४ नगरसेवक निवडले जातील. आ. जितेंद्र आव्हाड यांच्या कळवा-मुंब्र्यातील माजी नगरसेवक भाजपत जायला निघाले असताना एकनाथ शिंदे यांनी त्यांना ओढून नेले. केवळ कळव्यातून १६ नगरसेवक पालिकेत जाणार आहेत. आता त्याचा वचपा भाजप घोडबंदर रोडचे खड्डे, कोंडी व टेस्लाच्या माध्यमातून काढत आहे.