मुंबईप्रमाणेच येथेही बेशिस्त पार्किंगला चाप लावा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 12:08 AM2019-07-10T00:08:12+5:302019-07-10T00:08:16+5:30

पादचाऱ्यांनी केली मागणी : वाहनतळांअभावी वाहने उभी करायची कुठे?, वाहनचालकांना पडला प्रश्न

Arrangement of parking charges as well as Mumbai! | मुंबईप्रमाणेच येथेही बेशिस्त पार्किंगला चाप लावा!

मुंबईप्रमाणेच येथेही बेशिस्त पार्किंगला चाप लावा!

Next



लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : मुंबई महापालिकेने रविवारपासून बेकायदा वाहन पार्किंग करणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला असताना कल्याण-डोंबिवलीतही वाहनचालकांच्या बेशिस्तीला चाप लावण्याची मागणी पादचाºयांकडून होत आहे. मात्र, वाहनतळाअभावी वाहने उभी करायची कुठे? असा प्रश्न वाहनचालकांना पडला आहे. तर, दुसरीकडे पार्किंग धोरणही केडीएमसीने बासनात गुंडाळल्याने वाहतूक व्यवस्थेचा आणि पार्किंगचा खेळखंडोबा कायम राहण्याची शक्यता आहे.
बेशिस्त चालकांना वठणीवर आणण्यासाठी मुंबई महापालिकेने सार्वजनिक वाहनतळांच्या ५०० मीटर परिसरात बेकायदा पार्किंग करणाºया वाहनांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. वाहनांची वाढती संख्या, कुठेही उभी केली जाणारी वाहने आणि त्यामुळे वाहतूक व पादचाºयांना होणार अडथळा लक्षात घेता मुंबई महापालिकेने, अशा वाहनांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या कारवाईत एक ते दहा हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जात आहे. मुंबईच्या धर्तीवर कल्याण-डोंबिवलीतही अशी कारवाई व्हावी, अशी मागणी पादचारी करीत आहेत.
वाहनांच्या संख्येत पडणारी भर पाहता कल्याण-डोंबिवलीतील वाहनतळे अपुरी पडू लागली आहेत. त्यात डोंबिवली पूर्वेतील चिमणी गल्लीतील वाहनतळाचा एक मजला रिक्षांना आंदण देण्याचा प्रस्ताव नुकताच केडीएमसीच्या महासभेत मंजूर करण्यात आला आहे. एकीकडे नागरिकांना वाहने पुरेशा वाहनतळाअभावी रस्त्यावरच उभी करावी लागत असताना लोकप्रतिनिधींचे धोरणच एकप्रकारे वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडण्याला कारणीभूत ठरत आहे.
वाहतूककोंडी आणि पार्किंगचा प्रश्न गंभीर बनला असताना ‘बेशिस्ती’ला चाप लावणारे पार्किंग धोरण माजी महापौर राजेंद्र देवळेकर यांच्या कार्यकाळात मंजूर झाले आहे. रस्त्यांवरील पार्किंगसाठी शुल्क आकारणे, कोंडी होणाºया रस्त्यांवर नो पार्किंग, गॅरेज व वाहन खरेदी-विक्री करणाºयांकडून पार्किंग शुल्क आकारणे, कंपन्यांच्या बसना सकाळ व सायंकाळी शहरात प्रवेशबंदी, त्यांचे पिकअप आणि ड्रॉप पॉइंट वर्दळीच्या ठिकाणापासून दूर ठवणे तसेच रस्त्यावर अनेक दिवस उभ्या असलेल्या वाहनांवर कारवाई आणि रिक्षा स्टॅण्डची फेरआखणी ही पार्किंग धोरणाची प्रमुख वैशिष्ट्य होती. मात्र, जुन्या रस्ता रुंदीकरणात बाधित झालेल्या इमारतींना पार्किंग शुल्कात सवलत देणे तर सम-विषम तारखेनुसार ठराविक रस्त्यांच्या बाजूला वाहने उभी करताना अर्ध्या तासापर्यंत कोणतेही शुल्क न घेणे या मुद्यांचाही अंतर्भाव होता. या धोरणाला महासभेची मान्यताही घेण्यात आली. परंतु, हे धोरण कागदावरच राहिले आहे. महासभेची मंजुरी मिळाल्यानंतर याची अंमलबजावणी करण्यासाठी निविदा प्रसिद्ध केली. परंतु, त्याला प्रतिसाद मिळाला नसल्याने ठोस कृती झालेली नाही, असे कारण प्रशासनाकडून दिले जात आहे. त्यामुळे सद्यस्थितीत तरी बेशिस्तीला चाप लागणे अशक्य असल्याचे बोलले जात आहे.

अनेक वाहनचालक चुकीच्या पद्धतीने वाहने उभी करतात तसेच नो पार्किंगच्या ठिकाणीही बिनधास्तपणे गाड्या उभ्या केल्या जातात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. याचा फटका कामावर जाणाºया चाकरमान्यांसह शालेय विद्यार्थ्यांनाही बसतो. त्यामुळे दिवसागणिक वाढत असलेल्या वाहनचालकांच्या बेशिस्तीला चाप लागलाच पाहिजे. मुंबईच्या धर्तीवर कल्याण डोंबिवलीतही कारवाई व्हावी
- कांचन क्षीरसागर, पादचारी

वाहनचालकांकडून बेकायदा पार्किंग केले जाते, ही वस्तुस्थिती आहे, पण पार्किंगसाठी पुरेशी वाहनतळ नसल्याने वाहने नाइलाजास्तव रस्त्यावरच जागा मिळेल तिथे उभी करावी लागतच आहेत. वाहनतळे बांधणे गरजेचे आहे. अन्यथा वाहने कुठे उभी करायची, याचे स्पष्टीकरण कारवाई करणाºयांनी द्यावे.
- स्वप्निल सावंत, दुचाकीचालक

Web Title: Arrangement of parking charges as well as Mumbai!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.