पालघर : तारापूर येथील नियोजित जिंदाल जेटीला तीन वर्षांपूर्वी प्रखर विरोध केल्यानंतर घेतलेल्या जनसुनावणीचा अहवाल अजून खुला करण्यासाठी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांना साकडे घातले. शिवसेना उपनेते अनंत तरे यांच्या नेतृत्वाखाली या वेळी स्थानिक मच्छीमार, कोळी व गावकऱ्यांच्या वतीने ही मागणी एका निवेदनाद्वारे करण्यात आली. तसेच, जनभावना लक्षात घेऊन प्रस्तावित जिंदाल जेटीला विरोधात आंदोलन केले जाईल, असा इशारा या वेळी देण्यात आला.मे. जिंदाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड, मुंबई या कंपनीचा येथे बंदर उभारणीचा मानस आहे. त्यासंदर्भात आॅक्टोबर २०१२ मध्ये बोईसर येथे पंचक्र ोशीतील नागरिकांनी तत्कालीन ठाणे जिल्हाधिकारी यांच्या समक्ष आपला विरोध प्रदर्शित केला होता. येथे जर बंदर झाले तर आमच्या जीवनमरणाचा प्रश्न निर्माण होईल, अशा तीव्र भावना मांडून हजारोंच्या संख्येने आपला निषेध नोंदविला होता. त्या वेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समितीने आपला अहवाल केंद्र व राज्य सरकारला पाठविला होता. मात्र, तीन वर्षे उलटले तरी तो जनतेसाठी खुला न झाल्याने या प्रकल्पाला विरोध करणारे ग्रामस्थ घायकुतीला आले आहेत. आपले गाव उद्ध्वस्त होणार, या भीतीने येथील गावकरी तणावाखाली जीवन जगत आहेत. या पार्श्वभूमीवर त्या जनसुनावणीचे पुढे काय झाले, याची माहिती शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी बांगर यांच्याकडे मागितली. (प्रतिनिधी)
जिंदाल जेटीचा अहवाल जाहीर करा
By admin | Updated: August 18, 2015 23:16 IST