कल्याण : गेल्या सहा महिन्यांपासून ६० हजार ५५० रुपयांची वीजचोरी केल्याप्रकरणी नासीर नियमातुल्लाह खान (राहणार- ८३०, विम्को नाका, के. बी. रोड पेट्रोल पंपाजवळ, अंबरनाथ (पश्चिम)) याच्याविरुद्ध अंबरनाथ पोलीस ठाण्यात वीज कायदा-२००३ च्या कलम १३५ अन्वये वीजचोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. यासंदर्भात महावितरणच्या अंबरनाथ उपविभागातील सहायक अभियंता प्रकाश हरड यांनी फिर्याद दिली.
महावितरणच्या वतीने सध्या वीजचोरांविरुद्ध धडक मोहीम राबविण्यात येत असून या मोहिमे अंतर्गत हरड व त्यांचे सहकारी सहायक अभियंता मनीषा मुहे, मनोज कुमावत, रोशन देसले, मुख्य तंत्रज्ञ व्यंकट बनसोडे, विद्युत सहायक करमचंद राठोड, शेखर दहातोंडे हे नेताजी मार्केट जवळील विम्को नाका परिसरात तपासणी करीत होते. त्यावेळी आरोपी नासीर खान याने अब्दुल रशीद खान या ग्राहकाच्या घरी असलेल्या मीटरसाठीच्या सर्व्हिस वायरला टॅपिंग (जोडून) करून परस्पर वीजपुरवठा घेतल्याचे आढळून आले.
अधिक तपासणी केली असता गेल्या सहा महिन्यांपासून त्याने ३ हजार ६३६ युनिट विजेची चोरी केल्याचे निष्पन्न झाले असून त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वीजचोरीच्या गुन्ह्यात तीन वर्षांपर्यंत कारावास व दंडाच्या शिक्षेची तरतूद असून विजेचा अनधिकृत वापर टाळण्याचे आवाहन कल्याण परिमंडळाचे मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांनी केले आहे.