कसारा : कसा-याजवळील सुसरवाडी या संपूर्ण आदिवासीपाड्यातील एका तरुणीचा विवाह मुरबाड तालुक्यातील केळेवाडी येथील तरुणासोबत रविवारी होता. दोन महिन्यांपूर्वी ठरलेल्या या विवाहसोहळ्याच्या दिवशीच नवरदेवाची एमपीएससीची परीक्षा असल्याने नवरदेवासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला होता. आयुष्यातील दोन्ही परीक्षा महत्त्वाच्या असल्यामुळे पहिले प्राधान्य कोणाला दिले पाहिजे, असा प्रश्न नवरदेवाला पडला. परंतु, या नवरदेवाने होणाऱ्या अर्धांगिनीशी चर्चा करीत पहिले प्राधान्य परीक्षेला दिले. त्यानंतर, तब्बल तीन तास उशिराने विवाह आटोपला.
सुसरवाडी येथील अनंता हरी आमले यांची मुलगी चंद्रकला हिचा विवाह मुरबाड केळेवाडी येथील माणिक पोकळा यांचा मुलगा नीलेश याच्याशी दोन महिन्यांपूर्वी ठरला होता. नीलेश हा उच्चशिक्षित असल्याने त्याची एमपीएससीची परीक्षा विवाह ठरवताना १२ मार्चदरम्यान होती म्हणून तारीख निवडण्यात आली होती. विवाहाची तयारी झाली. पत्रिकांचे वाटप झाले. विवाहाची तारीख जवळ आली, त्याचदरम्यान नीलेशची परीक्षा रद्द झाली व २१ मार्च रोजी घेण्याचे जाहीर केले. परीक्षा ठाण्याला होणार असल्याचा मेसेज नीलेशला आला. यामुळे द्विधा मन:स्थितीत असलेल्या त्याने आपल्या घरच्यांना सांगून मुलीकडील मंडळींशी संपर्क केला व होणाऱ्या अर्धांगिनीशी चर्चा केली. दुपारी ३ वाजता होणारा विवाहसोहळा दोन ते तीन तास पुढे ढकलण्याची विनंती केली. परीक्षा देऊन आल्यावर आपला विवाह पार पाडण्यास मुभा देणाऱ्या चंद्रकलाचे शहापूर तालुक्यात कौतुक होत आहे. शिक्षणास प्रथम प्राधान्य देणाऱ्या आमले व पोकळा या दोन्ही कुटुंबांचे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी भेट घेत अभिनंदन केले.
---------------------------------------------------------
आयुष्यातील वळणावर जसे विवाहास प्राधान्य दिले जाते, तसे शिक्षणासही दिले पाहिजे. आदिवासी समाजात शिक्षणाची गोडी वाढत आहे. या अगोदर अशिक्षित असलेल्या पिढीने खूप त्रास सहन केला. पण, यापुढे गरीब, आदिवासींच्या मुलामुलींनी उच्चशिक्षण घेतले पाहिजे, त्यासाठी विवाहाऐवजी शिक्षणास प्राधान्य दिले.
- चंद्रकला आमले-पोकळा, नववधू