मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेतील शिवसेना गटनेते हरिश्चंद्र आमगावकर यांचे मंगळवारी कोरोना संसर्गामुळे निधन झाले असताना आज बुधवारी त्यांच्या आईंचेदेखील निधन झाले.
27 मे पासून आमगावकर, त्यांची आई, पत्नी व भावास कोरोनाची लागण झाल्याने ठाण्याच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्यांची पत्नी व भावाने कोरोनावर मात केली. ते बरे होऊन घरी परतले. परंतु तेरा दिवस कोरोनाशी झुंज दिल्यानंतर मंगळवार 9 जून रोजी 47 वर्षांच्या आमगावकर यांचे निधन झाले. आज 10 जून रोजी त्यांचा वाढदिवस होता आणि सकाळी त्यांच्या आईनेदेखील प्राण सोडला. मुला पाठोपाठ आईचेदेखील निधन झाल्याने आमगावकर यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.
भाईंदर पूर्वेच्या गोडदेव - न्यू गोल्डन नेस्ट - इंद्रलोक - फाटक भागातून 2012 साली ते निवडून आले होते. याच परिसराच्या प्रभाग 10 मधून आमगावकर हे 2017 साली पुन्हा नगरसेवक झाले. कोरोनाच्या संसर्ग काळात प्रभागातील नागरिकांना त्यांनी अन्न धान्य, भाजीपाला, जेवण उपलब्ध करून देण्यास ते जातीने फिरत होते. प्रभागात कोरोनाचे रुग्ण जास्त प्रमाणात सापडू लागल्याने त्यांना उपचारासाठी दाखल करण्या पासून परिसरात निर्जंतुकीकरण करणे, कंटेन्मेंट झोन मधील रहिवाशांना गरजेच्या वस्तू पुरवणे आदी कामात त्यांनी पुढाकार घेतला होता.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे ते आई, पत्नी पूजा, भाऊ आदी कुटुंबियांना रायगड येथील गावी सोडण्यास गेले होते. परंतु तेथे प्रकृती अस्वास्थ्यामुळे सर्वाना घेऊन परत भाईंदरला आले. 27 मे रोजी त्यांना भीमसेन जोशी कोविड रुग्णालयात दाखल केले. सर्वांचे स्वाबचे नमुने घेतल्यावर त्यांना ठाण्याच्या होरायझन या खाजगी रुग्णालयात दाखल केले गेले. लढवय्या शिवसैनिक हरपला
रायगड किल्ल्याच्या पायथ्याशीच गाव असलेले आमगावकर हे सामान्य कुटुंबातले . भाईंदरच्या गोडदेव गावात राहणारे शिवसैनिक पासून शाखा प्रमुख आणि नगरसेवक असा त्यांचा प्रवास देखील तळागाळातून पुढे आलेला . विनायक व तारा घरत यांचा त्यांना सुरवाती पासून पाठिंबा मिळाला . लोकांच्या अडीअडचणीला धावून जाण्यासह लोकांशी चांगला संपर्क ठेऊन होते . प्रभागात सक्रिय नगरसेवक म्हणून परिचित होते, ते स्थायी समितीचे सभापती होते . पालिका सभागृहात व बाहेर देखील शिवसेनेची भूमिका आक्रमकपणे मांडत असत . हा लढवय्या शिवसैनिक कोरोना विरुद्धच्या युद्धात लोकांसाठी लढला पण स्वतःचे आयुष्य मात्र कोरोना समोर हरवून बसला अश्या भावना अनेकांनी व्यक्त केल्या .