विरार : सध्या आजी-आजोबाच्या भूमिकेत वावरत असलेल्या ज्येष्ठांनी आपल्या शाळेत जाऊन त्याच वर्गात असलेल्या बाकावर बसून ५० वर्षांपूर्वीच्या शालेय आठवणींना उजाळा दिला. विरारमधील अण्णासाहेब वर्तक स्मारक विद्यामंदिरच्या १९६६ च्या ११ वीच्या परिक्षेच्या ३९ माजी विद्यार्थ्यांनी आगळेवेगळे स्रेहसंमेलन घडवून आणले. १९६६ पर्यंत ११ वीपर्यंत शालांत परिक्षा होती. त्यानंतर १० वी करण्यात आली. त्यावेळच्या बॅचच्या ३९ विद्यार्थी-विद्यार्थींनींना हुडकून त्यांना तब्बल ५० वर्षांनी एकत्र आणण्याचे काम अरुण वैद्य आणि छाया गाळवणकर यांनी केले. यावेळी शालेय जीवनातील न विसरता येणाऱ्या अनेक आठवणींना उजाळा दिला. आयुष्याच्या संध्याकाळी त्या क्षणाचे महत्व स्मृतीतून अधिक गडद होत गेले. दिवसभर रंगलेल्या संमेलनात विद्यार्थ्यांनी त्यावेळच्या गुरुजनांचा सत्कार करून आपली कृतज्ञता व्यक्त केली. प्रकाश पाटील, स्मिता बेरी-सामंत, मनोहर पितळे, अरविंंद ठाकूर, हेमंत राऊत, सुदाम पाटील, जयवंत कदम, मंदा कराडकर यांच्यासह अनेकांनी पूर्वीच्या आठवणी सांगितल्या. यापुढे दरवर्षी पुन्हा भेटण्याची ग्वाही देत सर्वजण जड अंत:करणाने आपापल्या घरी परतले. (प्रतिनिधी)
५० वर्षांनंतर पुन्हा त्याच बाकावर
By admin | Updated: June 24, 2016 03:23 IST