"मी ठाण्यातून लढण्यास तयार, सत्तेत आल्यास विराेधक तुरुंगात"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2023 08:53 AM2023-04-06T08:53:04+5:302023-04-06T08:53:18+5:30

आदित्य ठाकरे यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान

Aditya Thackeray challenges CM Eknath Shinde that I am ready to fight from Thana, if I come to power, opponents in jail | "मी ठाण्यातून लढण्यास तयार, सत्तेत आल्यास विराेधक तुरुंगात"

"मी ठाण्यातून लढण्यास तयार, सत्तेत आल्यास विराेधक तुरुंगात"

googlenewsNext

लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: ठाण्याने शिवसेनेला पहिली सत्ता दिली, ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. याच ठाण्यातील घटनाबाह्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात निवडणूक लढायला मी तयार आहे.  मी लढणार आणि जिंकूनही दाखवणार, असे खुले आव्हान शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी बुधवारी दिले. पुन्हा आमचे सरकार आल्यावर विरोधकांना जेलभरो यात्रा घडविण्याचा इशारा त्यांनी दिला.

दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे यांना झालेल्या मारहाणीनंतरही पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्याच्या निषेधार्थ बुधवारी ठाण्यात महाविकास आघाडीतर्फे ‘जनप्रक्षोभ मोर्चा’ काढण्यात आला. यानंतर शक्तिस्थळावर झालेल्या सभेत ते बोलत होते. आदित्य म्हणाले, ठाण्यात महिलेवर अत्याचार होत असताना मुख्यमंत्री एक शब्द बोलत नाही, याचे आश्चर्य वाटते. त्यामुळे मी इथे घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांवर टीका करण्यासाठी नव्हे, तर त्यांचे कौतुक करण्यासाठी आलो आहे, असा उपरोधिक सूर त्यांनी लावला. मिंधेंच्या चिंधीचोरांनी एका महिलेला मारहाण केली. मात्र, तिची तक्रार घेतली नाही. उलट तिच्याविरोधातच गुन्हा दाखल होतो, हा कोणता न्याय आहे, असा सवालही त्यांनी केला. 

आदित्य म्हणाले की, सुप्रिया सुळे, सुषमा अंधारे यांच्याविषयी गलिच्छ भाषेत बोलले जाते; पण त्या नेत्यांवर कारवाई होत नाही. उलट त्यांच्या पाठीवर मुख्यमंत्री कौतुकाची थाप मारतात हे दुर्दैवी आहे. गुंडांना पाठबळ दिले जात आहे, यातून फडणवीसांचे नाव खराब होत आहे. कोरोना काळात उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कामामुळेच त्यांना कुटुंबप्रमुख म्हणून बोलले जाते.

तुम्हारा नाम भुला देंगे- राज्यातील सरकारला ‘चले जाव’ करायची वेळ आली आहे. हमारा नामोनिशाण मिटाने चले हो, माझे नाव आदित्य रश्मी उद्धव ठाकरे आहे. त्यामुळे सामने आओ हम तुम्हारा नाम भुला देंगे, असा इशाराही त्यांनी दिला.

चोरांच्या टोळीचे कृत्य- तक्रार करण्यासाठी गेलो असता, पोलिस आयुक्तही पळून जातात; पण याबद्दल कोणाला काय बोलणार? ज्यांच्या पक्षाचे सरकार आहे, त्यांनी पक्ष चोरलेला आहे, त्यामुळे चोरांची टोळी हे कृत्य करू शकते, असेही ते म्हणाले.

आमचे सरकार येणार, विसरू नका- सध्या तुम्हाला आमच्यावर किती गुन्हे दाखल करायचे ते करा. मात्र, पुन्हा आमचे सरकार येणार आहे, हे विसरू नका. जेव्हा आमचे सरकार येईल तेव्हा तुम्हा सर्वांना ‘जेलभरो यात्रा’ घडविली नाही तर बघा, असा इशारा आदित्य यांनी दिला. आम्ही आता ‘मविआ’ची वज्रमूठ केली आहे. ठाणेकरांनी आम्हाला साथ द्यावी, असे आवाहन केले. 

Web Title: Aditya Thackeray challenges CM Eknath Shinde that I am ready to fight from Thana, if I come to power, opponents in jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.