ठाणे: ठाणे महापालिका हद्दीत कोविशिल्ड लसीचा तुटवडा उद्भवल्याने दुसरा डोस मिळणार की नाही, याबाबत शंका उपस्थित झाल्या आहेत. मात्र, कोविशिल्ड लसींचा ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयासह ग्रामीण भागातील आरोग्यकेंद्रांवर पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. त्यामुळे ग्रामीण भागात ज्यांनी ज्यांनी कोविशिल्डची पहिली लस घेतली असेल, त्यांना त्याची दुसरी लसही तिच दिली जाणार आहे. मार्च महिन्याच्या १ तारखेपासून सर्वत्र ४५ ते ६० वयोगटातील व्याधीग्रस्त नागरिकांसह ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण सुरू झाले आहे. जिल्ह्यातील सहा महापालिका, दोन नगरपालिका आणि ग्रामीण क्षेत्रात लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात दोन लाख २१ हजार ३६३ जणांचे लसीकरण करण्यात आले. यामध्ये एक लाख ८२ हजार ५३४ जणांना पहिला डोस दिला असून, ३८ हजार ८२९ जणांनी दुसरा डोस घेतला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनीष रेंघे यांनी दिली. फेब्रुवारी महिन्याच्या पंधरवड्यानंतर ठाणे जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात पुन्हा कोरोनाने आपले डोके वर काढले आहे. त्यात कोरोनाची दुसरी लाट आल्याची चर्चादेखील जिल्ह्यात सर्वत्र सुरू आहे. त्यामुळे कोरोना लस घेण्यासाठी दिवसेंदिवस नागरिकांची लसीकरण केंद्रांवर गर्दी होत आहे. अशातच ठाणे शहरात कोविशिल्ड लसीचा तुटवडा निर्माण झाल्याने तिचा पहिला डोस घेतलेल्या नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असताना ठाणे महानगरपालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी मात्र या लसीचा दुसरा डोस देण्याइतका साठा उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले आहे.
जिल्ह्यात लसींचा पुरेसा साठा, आतापर्यंत दोन लाख २१ हजार ३६३ जणांचे लसीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2021 09:32 IST