उल्हासनगर : मानेरेगाव भोईर चाळ रूम नं-४ येथील हुक्का पार्लरवर विठ्ठलवाडी पोलिसांनी बुधवारी रात्री पावणे बारा वाजता धाड टाकली. यावेळी ९ इसम हुक्का पिताना आढळून आले असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
उल्हासनगर कॅम्प नं-४ मानेरेगाव येथिल एका चाळीतील खोलीत अवैधपणे हुक्का पार्लर चालविले जाता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलकर्णी यांच्या पथकाने बुधवारी रात्री पावणे बारा वाजता हुक्का पार्लरवर धाड टाकली. राकेश नाथा भोईर हा तरुण बेकायदेशीरपणे हुक्का पार्लर चालवीत असल्याचे पोलिसांना आढळून आले. तसेच याठिकाणी एकूण ९ इसम हुक्का पीत असताना मिळून आले. त्यांच्यावर विठ्ठलवाडी पोलीस ठाणे मध्ये महाराष्ट्र राज्य सिगारेट व इतर तंबाखू उत्पादन सुधारित अधिनियम २०१८ चे कलम ४अ, २१अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच एकूण ९ हजार ९४० रुपयाचा (हुक्का पॉट, हुक्का फ्लेवर) जप्त करण्यात आलेला आहे. असी माहिती पोलीस उपायुक्त सचिन खरे यांनी दिली आहे.