लोकमत न्यूज नेटवर्क
टोकावडे : कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याने मुरबाड नगरपंचायतीने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मास्क न घालता सार्वजनिक ठिकाणी वावरणाऱ्या नागरिकांविरोधात दंडात्मक कारवाई सुरू केली आहे.
मुरबाड तालुक्यात आतापर्यंत एक हजार १८७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे तर, ५९ जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य प्रशासन, नगरपंचायत, पोलीस, पत्रकार यांनी वेळोवेळी कोरोनाविषयी नियम व खबरदारी घेण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. मात्र, तरीही काही नागरिक विनामास्क फिरत आहेत. तसेच सोशल डिस्टन्सिंगचाही फज्जा उडत असल्याचे दिसत आहे.
मुरबाडमध्ये सध्या तीन रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर, १२ जणांना घरी विलगीकरण कक्षात ठेवले आहे. कोरोनाचा धोका कायम असताना मुरबाड शहरातील मुख्य बाजारपेठेत मास्क न वापरता बेजबाबदारपणे फिरणाऱ्या दुचाकीस्वार व नागरिकांवर बुधवारपासून नगरपंचायतीने दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. नगरपंचायतीचे कर्मचारी संदीप सोनावळे, जयेश माळी, जगदीश देवकर व मुरबाड पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक विजय गांजाळे यांच्या पथकाने तीनहात नाका पोलीस चौकी व शहराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ मास्क न वापरणाऱ्यावर दंडात्मक कारवाई केली आहे.
------------------