अंबरनाथ: अंबरनाथचे शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्यावर शिवसेना शाखेतच गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबारात दोघांचा मृत्यू झाला होता तर वाळेकर थोडक्यात बचावले होते. या गोळीबार प्रकरणातील आरोपी याला तब्बल १४ वर्षानंतर गुजरात मधून अटक करण्यात यश आले आहे.
नोव्हेंबर २०११ मध्ये वाळेकर यांच्यावर अंबरनाथच्या शिवसेना शाखेत गोळीबार करण्यात आला होता. दोन ते तीन मारेकरांनी अंदाधुंद फायरिंग करत वाळेकर यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. या हल्ल्यानंतर वाळेकर यांच्या अंगरक्षकांनी देखील स्वसंरक्षणार्थ फायरिंग करणाऱ्यांवर गोळीबार केला. त्यात एक मारेकरी तर वाळेकर यांचा एक अंगरक्षक मारले गेले. या हल्ल्यातून वाळेकर थोडक्यात बचावले होते.
या प्रकरणातील एक सोडून इतर सर्व आरोपींना अटक करण्यात आली होती. मात्र एक मारेकरी राजेश शर्मा हा घटनेच्या दिवसापासूनच फरार होता. शिवसेनेच्या नगरसेवकांनेच वाळेकर यांच्यावर फायरिंग करण्यासाठी सुपारी दिल्याचे समोर आले होते. या सर्व घटनाानंतर राजेश शर्मा नावाचा आरोपी गुजरातमध्ये नाव बदलून राहत असल्याचे निदर्शनास आले होते. अखेर उल्हासनगरच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने आरोपीला ताब्यात घेतले आहे.