नालासोपारा (मंगेश कराळे) : विरारच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी दोन लाख रुपयांच्या गांज्यासह एका आरोपीला अटक केल्याची माहिती शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली आहे.
विरार पोलीस ठाणे हद्दीत गुरुवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास चंदनसार रोडवरील वजन काटा येथे एक जण गांजा हा अंमली पदार्थ विक्री करण्याकरीता घेणार असल्याची खात्रीशिर बातमी विरारच्या गुन्हे प्रकटीकरण पथकास मिळाली होती. मिळालेली बातमी वरिष्ठांना कळवून त्यांनी दिलेल्या मार्गदर्शक सुचना व आदेशान्वये लागलीच सदर ठिकाणी सापळा रचून आरोपीला शिताफिने ताब्यात घेतले. पकडलेल्या आरोपीचे नाव विकास मौर्या (२६) असे आहे. त्या आरोपीची अंगझडती घेतली असता, त्याचे कब्जात २ लाख रुपये किंमतीचा १० किलो वजनाचा गांजा नावाचा अंमली पदार्थ मिळून आल्याने तो जप्त करण्यात आला आहे. विरार पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा नोंद केला आहे.
सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहायक पोलीस आयुक्त रामचंद्र देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली विरारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुशिलकुमार शिंदे, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश फडतरे, पोलीस हवालदार सचिन लोखंडे, संदिप जाधव, विशाल लोहार, इंद्रनिल पाटील, संदिप शेरमाळे, संदिप शेळके, मोहसिन दिवाण, सचिन बळीद, बालाजी गायकवाड, रोशन पुरकर, दत्तात्रय जाधव व प्रफुल सोनार यांनी पार पाडली आहे.