लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ओला, उबेर यासारख्या खासगी टॅक्सी आरक्षित करून नंतर त्यातील चालकाला निर्जनस्थळी नेऊन कार पळवून नेणा-या ऐतेशामउद्दीन खान (३२, रा. कौसा, मुंब्रा, ठाणे) या सराईत चोरट्याला डायघर पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. त्याच्याकडून दोन लाखांच्या टॅक्सीसह तीन मोबाइल असा चार लाख ८७ हजारांचा ऐवज हस्तगत केल्याची माहिती पोलिसांनी दिली.मुंब्रा आणि शीळ डायघर भागात खासगी मोटारकार आरक्षित करून त्या वाहनामधील चालकाला वेगवेगळ्या बहाण्याने निर्जनस्थळी नेल्यानंतर कारची चोरी झाल्याची तक्रार १६ डिसेंबर २०१९ रोजी शीळ-डायघर पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. ती दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप सरफरे, उपनिरीक्षक विकास राठोड आणि पोलीस हवालदार प्रकाश शिरसाठ आदींच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तसेच खबऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे २० डिसेंबर रोजी यातील संशयित खान याला कौसा येथील सिरीन व्हिला या इमारतीमधून ताब्यात घेतले. व्यवसायाने चालक असलेल्या खान याने चौकशीमध्ये शीळ-डायघर आणि मुंब्रा परिसरांत अशा प्रकारे वाहने चोरल्याची कबुली दिली. या दोन्ही पोलीस ठाण्यांतील वाहनचोरीचे दोन गुन्हे उघड झाले आहेत. सखोल चौकशीमध्ये दोन लाखांची ओला खासगी प्रवासी वाहतूक करणारी टॅक्सी तसेच मुंब्रा येथून चोरलेली दोन लाख ५० हजारांची अन्य एक मोटारकार तसेच तीन वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाइल असा चार लाख ८७ हजारांचा ऐवज हस्तगत केला. त्याच्याकडून आणखीही वाहनचोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता असून पोलीस हवालदार मारुती कदम हे अधिक तपास करीत आहेत. खान याला तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
टॅक्सी आरक्षित करून ती पळवून नेणारा सराईत चोरटा ठाण्यात जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 22:06 IST
खासगी टॅक्सी आरक्षित करून नंतर त्यातील चालकाला निर्जनस्थळी नेऊन कार पळवून नेणाऱ्या ऐतेशामउद्दीन खान (३२, रा. कौसा, मुंब्रा, ठाणे) या सराईत चोरट्याला डायघर पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे.
टॅक्सी आरक्षित करून ती पळवून नेणारा सराईत चोरटा ठाण्यात जेरबंद
ठळक मुद्देडायघर पोलिसांची कारवाई दोन वाहनांसह ४.८७ लाखांचा ऐवज हस्तगत