मुरलीधर भवार / कल्याणशहरातील आधारवाडी डम्पिंग ग्राउंड शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्यासाठी तीन वर्षे लागणार आहेत. तर, बारावे आणि मांडा भरावभूमी विकसित करण्याचे काम वर्षभरात पूर्ण होईल, असे केडीएमसीने राष्ट्रीय हरित लवादाकडे शुक्रवारी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. याप्रकरणाची पुढील सुनावणी १२ एप्रिलला होणार आहे. लवादापुढे १५ मार्चला झालेल्या सुनावणीच्या वेळी जिल्हाधिकाऱ्यांनी केडीएमसीच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन घनकचरा प्रकल्पासंदर्भातील अहवालसादर केला होता. मात्र, तो अहवाल हा निराधार असल्याचे लवादाने म्हटले होते. लवादाने जिल्हाधिकारी व केडीएमसी आयुक्तांच्या दिरंगाईवर बोट ठेवले. केडीएमसी हद्दीतून प्रतिदिन ५७० मेट्रीक टन कचरा जमा होतो. त्यापैकी केवळ सहा टन कचऱ्यावर महापालिका प्रक्रियाकरते. तसेच उच्च न्यायालयात हे प्रकरण २००८ पासून सुरू असूनही केडीएमसीचे प्रयत्न अत्यंत तोकडे असण्यावर लवादाने ताशेरे ओढले. केडीएमसीचा कृती आराखडा व प्रतिज्ञापत्र हे २००० सालच्या घनकचरा व्यवस्थापन नियमवलीच्या आधारे होते. त्यामुळे २०१६ सालच्या घनकचरा व्यवस्थापन नियमावलीनुसार आराखडा व कालबद्ध कृती कार्यक्रम सादर करावा, असे लवादने स्पष्ट केले होते. अन्यथा, दिवसाला एक लाखाचा दंड आकारून शहरातील विकासकामे रोखली जातील, असा इशारा दिला होता. त्यानुसार, आयुक्तांनी २०१६ सालच्या घनकचरा व्यवस्थापन नियमावलीच्या आधारे प्रतिज्ञापत्र लवादाकडे सादर केले. याचिकाकर्ते कौस्तुभ गोखले पुन्हा नव्याने प्रतिज्ञापत्र ३० मार्चच्या आत लवादाकडे सादर करणार आहेत. त्यानंतर, पुढील सुनावणी १२ एप्रिलला होईल.
‘आधारवाडी’ होणार तीन वर्षांत बंद
By admin | Updated: March 25, 2017 01:14 IST