ठाणे : येथील शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत विशेष शाखा आस्थापनेवर कार्यरत असणाऱ्या महिला पोलीस नाईक पदावरील कर्मचारी आरती आनंद बेळगली यांची नुकतीच परराष्ट्र मंत्रालय, भारत सरकारमार्फत निवड केल्या जाणाऱ्या सहाय्यक सुरक्षा अधिकारी पदावर निवड झाली आहे. गुणवत्तेवर त्यांची ऑस्ट्रेलिया येथील भारत सरकारच्या दुतावासात नियुक्ती झाली आहे.
ठाणे जिल्ह्यातील आगरी समाजातील आरती बेळगली मूळच्या (माया पाटील) या भिवंडीमधील अलिमघर गावच्या आहेत. त्या सध्या बाळकूम येथे कुटुंबियांसह वास्तव्याला आहेत. विशेष म्हणजे विदेश मंत्रालय, भारत सरकारतर्फे सहाय्यक सुरक्षा अधिकारी म्हणून होणारी ही निवड अनेक गुणवत्ता व निष्कर्षांवर केली जाते. त्यात इंग्रजी भाषेचे ज्ञान, वक्तृत्व, धाडसीपणा, मेहनत घेण्याची तयारी, सचोटी, प्रामाणिकपणा व निष्ठा इत्यादी गुणांसह खेळ, वाहन चालविणे आदी कलागुणांचाही विचार केला जातो. या साऱ्या निष्कर्षांवर सिद्ध होऊन आरती बेळगली यांची झालेली ही निवड कौतुकास्पद आहे.
-----