ठाणे : ठाण्याचे रहिवासी असलेल्या एका चित्रपट दिग्दर्शक तथा निर्मात्याच्या बँक खात्यातून बुधवारी रात्री ८0 हजार रुपये परस्पर काढण्यात आले. बँक खात्याचा तपशील कुणालाही दिला नसतानादेखील अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असल्याने बँक खातेदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.ठाण्यातील सावरकनगर रहिवासी अखिल देसाई हे व्यवसायाने चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते आहेत. त्यांनी आगामी चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी आयडीबीआय बँकेच्या खात्यामध्ये पैसे जमवून ठेवले होते. गुरुवारी रात्री ते ठाण्यातील स्टुडिओमध्ये काम करीत होते. त्यावेळी मोबाईल फोन तपासला असता, त्यांच्या खात्यातून प्रत्येकी १0 हजार रुपये काढल्याचे चार मेसेज होते. देसाई यांनी लगेच आयडीबीआयच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधला. वारंवार डायल करूनही फोन लागत नसल्याने त्यांनी बँकेच्या ग्राहक तक्रार निवारण केंद्राशी संपर्क साधला. त्यानंतर देसाई यांचे खाते लगेच ब्लॉक करण्यात आले. मात्र तोपर्यंत रात्रीचे १२ वाजून गेले आणि दुसरा दिवस सुरू झाल्याने आरोपीला आणखी ४0 हजार रुपये काढण्याची संधी मिळाली. देसाई यांनी यासंदर्भात वर्तकनगर पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून, त्यांच्या खात्यातून दिल्ली येथील महिपालपूर येथून पैसे काढल्याची माहिती समोर आली आहे. या ठिकाणाहून ठाण्यातील आणखी काही खातेदारांचे पैसे काढल्याची माहिती पोलिसांनी दिली. देसाई यांनी १५ दिवसांपूर्वी लॅपटॉप विकत घेतला. त्यासाठी ठाणे रेल्वे स्थानकावरील एका एटीएममधून त्यांनी पैसे काढण्याचा प्रयत्न केला. खात्यात शिल्लक असतानाही एटीएममधून त्यांना पैसे मिळाले नव्हते. त्या घटनेचा आणि ताज्या फसवणुकीचा काही संबंध असावा, असा संशय देसाई यांनी व्यक्त केला.
ठाण्यातील चित्रपट दिग्दर्शक, निर्मात्याच्या खात्यातून ८0 हजार लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 19:21 IST
लोकांच्या बँक खात्यातून परस्पर पैसे काढून घेण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. याचा फटका ठाण्यातील एका चित्रपट दिग्दर्शक, निर्मात्यासही बसला. कॅशलेस सोसायटीचे आवाहन करताना सरकारला या परिस्थितीचाही गांभीर्याने विचार करावा लागणार आहे.
ठाण्यातील चित्रपट दिग्दर्शक, निर्मात्याच्या खात्यातून ८0 हजार लंपास
ठळक मुद्देचित्रपटाच्या प्रदर्शनासाठी केली होती तजवीजदिल्लीतून काढले पैसेगुन्हा दाखल