ठाणे : ठाणे महापालिका निवडणुकीत युतीची गरज ही भाजपाला अधिक असल्याने अगोदर भाजपाला ४५ जागा देऊ करणाऱ्या शिवसेनेने युती करायची झाल्यास ३५ पेक्षा जास्त जागा मिळणार नाही, असा पवित्रा घेतला आहे. युती केली अथवा स्वबळावर लढले तरी भाजपा ८ जागांवरून २० ते २५ जागांच्यापुढे जाणार नाही, याची पक्की खात्री पटल्यानेच शिवसेना आक्रमक झाली आहे. भाजपाने केलेल्या सर्व्हेत ठाण्यात भाजपाची उडी ही जास्तीतजास्त २५ जागांची राहील, असे स्पष्ट झाल्याने शिवसेनेने यापूर्वी देऊ केलेल्या जागांमध्ये १० जागांची घट केली. भाजपाच्या त्याच सर्व्हेनुसार शिवसेनेनी युती केली, तर ६५-७० जागांवर त्यांना यश मिळेल. मात्र, शिवसेना स्वबळावर लढल्यास शिवसेनेला ७५ जागांवर यश मिळेल, अशी माहिती पुढे आली. त्यामुळे आता युती न करता स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या दिशेने शिवसेनेच्या हालचाली सुुरू झाल्या आहेत.मुंबईत युतीची बोलणी फिस्कटल्यात जमा आहे. शिवसेनेने सोमवारी आपला वचननामा जाहीर केला. ठाण्यातही शिवसेना आपला वचननामा लवकरच जाहीर करण्याची शक्यता आहे. त्यामुळेच आता युती होऊच नये, याकरिता शिवसेनेने भाजपाला देऊ केलेल्या जागांमध्ये घट केल्याचे बोलले जाते.काही दिवसांपूर्वी शिवसेना भाजपाला ४५ जागा देण्यास तयार होती. त्या वेळी भाजपाची ६७ जागांची मागणी होती. भाजपा त्यावर आजही ठाम आहे. मागील निवडणुकीत भाजपाला केवळ २२ जागांवर समाधान मानावे लागले होते. त्यापैकी केवळ ८ जागांवर पक्षाला यश मिळाले. (प्रतिनिधी)
३५ जागा घेता की जाता?
By admin | Updated: January 24, 2017 05:51 IST