जान्हवी मोर्ये / डोंबिवलीज्या आगरी युथ फोरमने साहित्य संमेलन आयोजित केले आहे, त्यातील बहुतांश व्यक्तींचा २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका करण्यास पाठिंबा आहे. आश्वासन देऊनही मुख्यमंत्री ते पाळत नसल्याने त्याबाबतचा ठराव संमेलनाच्या सांगतेवेळी खुल्या अधिवेशनात मंजूर करण्यासाठी दबाव वाढत आहे. यापूर्वीच मराठा आरक्षण, वेगळा विदर्भ, राम गणेश गडकरींचा पुतळा तोडल्यानिमित्त अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा मांडत संभाजी ब्रिगेडचा निषेध करण्याबाबतचे ठराव करण्याची मागणी पुढे आली होती. मात्र यातील कोणते विषय साहित्य संमेलनाचे होऊ शकतात का, असा प्रश्न महामंडळ आणि आयोजकांपुढे आहे. यातील कोणतेही ठराव मंजूर झाले, तर त्यावरून गदारोळ होण्याची शक्यता असल्याने ते मांडावे की नाही, याबाबत खल सुरू आहे. त्यामुळे कोणते ठराव मांडले जातील, याबाबत काही ठरलेले नाही, अशीच भूमिका स्वागताध्यक्ष गुलाब वझे यांनी सोमवारच्या पत्रकार परिषदेत घेतली. मात्र सर्व विषय खुल्या अधिवेशनात मांडावे. मात्र त्यावर कोणतीही भूमिका घेऊ नये, असा मध्यममार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असे दिसते.
संमेलनात २७ गावांचा ठराव?
By admin | Updated: January 25, 2017 04:43 IST