अजित मांडकेमुख्य उपसंपादक
नेक वर्षांपासून ठाण्याची पाणी समस्या सोडविण्यासाठी महापालिका आणि राजकर्त्यांकडून आश्वासने दिली जात आहेत. त्यात वाढीव पाणी मिळावे यासाठी महापालिकेने विविध प्राधिकरणांना वारंवार पत्रव्यवहार केला आहे; परंतु अजूनही ठाणे शहराची पाणी समस्या काही केल्या सुटताना दिसत नाही. आता उन्हाळा सुरू होत असताना ठाणे शहरातील घोडबंदर, कळवा, खारेगाव, मुंब्रा, दिवा, तसेच इतर अनेक भागांना पाणीटंचाईचा फटका बसू लागला आहे. त्यामुळे पाणी समस्या सुटत नाही, तोपर्यंत नव्या इमारतींना ओसी देण्यात येऊ नये, अशी मागणी आता पुन्हा एकदा पुढे आली आहे.
ठाणे शहराची लोकसंख्या सुमारे २७ लाखांच्या आसपास पोहोचली आहे. शहरासाठी दररोज ६१६ दशलक्ष लिटर पाण्याचा कोटा मंजूर असला तरी प्रत्यक्षात सुमारे ५८५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होत होता. अलीकडे त्यात ५ दशलक्ष लिटरची वाढ होऊन सध्या सुमारे ५९० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होत आहे. मात्र, वाढती लोकसंख्या आणि मोठ्या प्रमाणात उभ्या राहणाऱ्या नव्या गृहनिर्माण प्रकल्पांमुळे सध्याचा पाणीपुरवठा अपुरा पडू लागला आहे.
लोकसंख्यावाढ गृहीत धरू ठाणे महापालिकेने पुढील ३० वर्षांसाठी पाणीपुरवठ्याचा आराखडा तयार केला आहे. त्यानुसार शहराला दररोज सुमारे १,११६ दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासणार आहे. त्यामुळे सध्याच्या मंजूर कोट्याव्यतिरिक्त सुमारे ४०० दशलक्ष लिटर अतिरिक्त पाणी मिळविण्यासाठी प्रशासनाने सूर्या आणि भातसा धरणांसह स्टेम प्राधिकरण व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे पाठपुरावा सुरू केला आहे, तसेच एमएमआरडीएच्या प्रस्तावित काळू धरणातून ४०० दशलक्ष लिटर पाण्याचा कोटा मिळावा यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. मात्र, यासंदर्भात अद्याप ठोस निर्णय झालेला नाही.
घोडबंदर रोड परिसरातील लोकसंख्या गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढली आहे. या भागासाठी पूर्वी ११५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जात होता, त्यात केवळ ५ दशलक्ष लिटरची वाढ करण्यात आली आहे. हा पुरवठा अत्यंत अपुरा आहे. या भागासाठी किमान १०० दशलक्ष लिटर अतिरिक्त पाणी देण्याची मागणी आहे. कळवा, खारेगाव, मुंब्रा, दिवा, तसेच इतर अनेक भागांमध्येही अशीच परिस्थिती आहे.
सध्या शहरात ४० टक्क्यांपर्यंत पाण्याची गळती होत आहे. ही गळती कमी करण्यासाठी अनधिकृत नळजोडण्या तोडण्यावर आणि पाणी वितरण व्यवस्थेत सुधारणा करण्यावर महापालिका भर देणार आहे.पाणीटंचाई टाळण्यासाठी स्वतंत्र धरण बांधण्याचा निर्णय झालेला नाही. पाणीपुरवठ्याचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची भीती आहे. त्यामुळे घोडबंदर रोड परिसरात नव्या गृहनिर्माण प्रकल्पांना परवानगी देण्यापूर्वी पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
Web Summary : Thane struggles with water shortage impacting Ghodbunder, Kalwa, and Mumbra. Despite approved quotas and efforts to secure more water from various sources, a 40% leakage exacerbates the crisis. Residents demand solutions before new construction permits are issued.
Web Summary : ठाणे पानी की कमी से जूझ रहा है, जिसका असर घोड़बंदर, कलवा और मुंब्रा पर पड़ रहा है। स्वीकृत कोटा और विभिन्न स्रोतों से अधिक पानी प्राप्त करने के प्रयासों के बावजूद, 40% रिसाव संकट को और बढ़ा देता है। निवासियों ने नई निर्माण परमिट जारी करने से पहले समाधान की मांग की है।