ठाणे : ठाणे परिवहन सेवेच्या ताफ्यात पुन्हा इलेक्ट्रिक बस खरेदीच्या हालचाली सुरू झाल्या असून २० बसगाड्यांच्या खरेदीसाठी २३ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. लवकरच या बसगाड्या परिवहनच्या ताफ्यात दाखल होणार असून ठाणेकरांच्या सेवेसाठी सज्ज होतील.
ठाणे महापालिका हद्दीत १०० इलेक्ट्रिक बस खरेदी करण्याबाबत साडेतीन वर्षांपूर्वी प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. परंतु केवळ एकच बसगाडी परिवहनच्या ताफ्यात दाखल झाली. ती सध्या बंद अवस्थेत आहे. नवी परिवहन समिती गठीत झाल्यानंतर पुन्हा १०० इलेक्ट्रिक बस खरेदी करण्यासाठी त्यांनी आग्रह सुरू ठेवला. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून प्रयत्न केले जात होते. त्याला आता यश आले. केंद्र सरकारने १५व्या वित्त आयोगाच्या तरतुदीनुसार पर्यावरणाचा समतोल राखला जावा, याकरिता महापालिका आणि नगरपालिका यांना विविध उपाययोजना करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला जात असतो. केंद्र सरकारकडून ठाणे महापालिकेला प्राप्त झालेल्या निधीपैकी परिवहन सेवेला २० इलेक्ट्रिक बसेस विकत घेण्यासाठी २३ कोटी निधी मंजूर केला आहे. या बसगाड्या आकाराने लहान असतील. अशा प्रकारच्या बसगाड्या नवी मुंबई, नाशिक, पुणे परिवहन सेवांच्या ताफ्यात यापूर्वीच दाखल झाल्या आहेत. त्याची माहिती घेऊन बसगाड्या घेण्याचे नियोजन ठाणे परिवहन सेवेने आखले आहे.
चौकट - मंजूर झालेल्या २३ कोटींच्या निधीतून ठाणे परिवहन सेवेला शहरात दोन चार्जिंग स्टेशन उभारायची असून ती कुठे उभारायची याकरिता सध्या पडताळणी सुरू आहे. त्याकरिता मुल्ला बाग, आनंद नगर येथील जुना जकात नाका आणि सॅटिस पूर्व येथील विचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
............
वाचली