६९ बसची होणार लिलावाद्वारे विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2019 12:54 AM2019-08-02T00:54:00+5:302019-08-02T00:54:08+5:30

परिवहन समितीचा हिरवा कंदील : दुरुस्तीचा खर्च परवडेना, चालक-वाहकांचीही कमतरता

19 buses will be sold through auction | ६९ बसची होणार लिलावाद्वारे विक्री

६९ बसची होणार लिलावाद्वारे विक्री

Next

कल्याण : शहरातील केडीएमटीच्या गणेशघाट आगारात खितपत पडलेल्या ६९ बसची विक्री लिलावाद्वारे करण्याच्या प्रस्तावाला गुरुवारी झालेल्या परिवहन समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. दुरुस्तीवर होणारा वाढीव खर्च आणि चालक, वाहकांची कमतरता पाहता हा निर्णय घेतल्याचे सभापती मनोज चौधरी यांनी सांगितले. दरम्यान, परिवहन समितीची या प्रस्तावाला मान्यता मिळाली असलीतरी महासभेचा निर्णय अंतिम असणार आहे. त्यामुळे महासभा या बसेसच्या लिलावविक्रीला मंजुरी देते का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात पूर्वीच्या १०० व जेएनएनयूआरएम योजनेंतर्गत खरेदी केलेल्या विविध प्रकारातील ११८ बस अशा एकूण २१८ बस आहेत. यापैकी दोन बसना अपघात झाल्याने सध्या २१६ बस कार्यरत आहेत. सद्य:स्थितीत परिवहन उपक्रमातील बसची संख्या, बसचे आयुर्मान, उपलब्ध चालक, वाहक व तांत्रिक कर्मचारी, आगारातील उपलब्ध मूलभूत सोयीसुविधा, जुन्या बसच्या दुरुस्तीकरिता येणारा वाढीव खर्च, दिवसागणिक प्रवासी संख्येत होणारी घट त्यामुळे वाढणारी तूट, तसेच केडीएमसीकडून पुरेसे अनुदान मिळण्यास येणाऱ्या अडचणी पाहता बसचे संचालन आणि जुन्या बसचे नियोजन करण्यासाठी परिवहन उपक्रमाने काही निर्णय घेतले आहेत. त्याचाच भाग म्हणून चालक-वाहकांची कमतरता आणि दुरुस्तीवर होणारा वाढीव खर्च पाहता गणेशघाट आगारात सद्य:स्थितीला खितपत पडलेल्या ६९ बस लिलावात विकण्याचा प्रस्ताव गुरुवारच्या परिवहन समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी मांडण्यात आला होता.

२०११ ते २०१४ या कालावधीत खरेदी केलेल्या ७० बसपैकी एक अपघातग्रस्त बस वगळता उर्वरित ६९ बस विकण्यासाठी ई-निविदा तसेच ई-लिलाव प्रक्रिया अवलंबण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वास्तविक, ज्या बसचे आयुर्मान १० वर्षांपेक्षा जास्त झाले आहे, त्या बस सरकारच्या मार्गदर्शक तत्वांनुसार भंगारात विक्री केल्या जातात. पण, ६९ बसचे आयुर्मान सरासरी ६ ते ८ इतके झालेले असून, सरकारी नियमाप्रमाणे त्यांचे आयुर्मान २ ते ४ वर्षे शिल्लक आहे. परंतु, देखभाल दुरुस्तीचा वाढलेला खर्च पाहता आगारात खितपत पडलेल्या बस उभ्या राहून खराब होण्याची शक्यता पाहता त्यांची जशा आहेत, त्या स्थितीत लिलाव करावा, यासंदर्भात प्रस्ताव परिवहन समितीसमोर मंजुरीसाठी आणावा, अशा सूचना २८ जूनच्या बैठकीत सर्व सदस्यांनी केल्या होत्या. त्यानुसार गुरुवारी प्रशासनाने सादर केलेल्या प्रस्तावाला सदस्यांनी मान्यता दिली. आता हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी महासभेकडे पाठविला जाणार आहे.

‘त्या’ बसच्या भंगारविक्र ीची प्रक्रिया सुरू : २१६ बसेसपैकी २००७ मध्ये दाखल झालेल्या अशोक लेलॅण्ड मेक स्टॅण्डर्डच्या १० बसचे आयुर्मान १० वर्षांपेक्षा जास्त झाले आहे. परिवहन समिती आणि महासभेच्या मंजुरीने या बस भंगारात काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून यासाठी ई-निविदेची कार्यवाही चालू केल्याची माहिती प्रशासनाकडून समितीच्या सदस्यांना देण्यात आली.

...तर जागा होईल
प्रस्तावावरील चर्चेदरम्यान २००५ च्या महापुरात नुकसान झालेल्या जुन्या ४२ बस अद्यापपर्यंत आगारात खितपत पडून असल्याकडेही सदस्यांनी लक्ष वेधले होते. यातील काही बस उपक्रमातील इंजीन आणि डिझेल फिल्टर घोटाळ्यातील आहेत. त्यामुळे त्या बस आहेत तशा ठेवण्यात आल्या आहेत. त्या बसचे आयुर्मान संपलेले आहे, पण बस सद्य:स्थितीला भंगार अवस्थेत आहेत. त्यामुळे आगारातील मोठी जागा व्यापली गेली आहे. घोटाळ्याप्रकरणी चौकशी करण्यासाठी त्या बस अन्यत्र हलवण्यात याव्यात, जेणेकरून आगारातील जागा मोकळी होईल, अशीही मागणी होत आहे.

Web Title: 19 buses will be sold through auction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :kalyanकल्याण