18 councilors for opposition leader | विरोधीपक्ष नेतेपदासाठी १८ नगरसेवक बंडाच्या पवित्र्यात
विरोधीपक्ष नेतेपदासाठी १८ नगरसेवक बंडाच्या पवित्र्यात

ठाणे : विरोधी पक्षनेतेपदावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात ठाणे विरुद्ध कळवा, मुंब्रा असा वाद रंगला असतानाच आता मुंब्य्रातील १८ नगरसेवक यासाठी एकवटले असून ते बंडाच्या पवित्र्यात आहेत. महापालिकेत जास्तीचे नगरसेवक नेहमीच मुंब्य्राने दिले आहेत. मात्र, असे असतानाही येथील नगरसेवकांना पालिकेत आजही स्थान नाही, असा सवाल करून मुंब्य्रातील नगरसेविका फरहाना शाकीर शेख यांनी शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांच्याकडे राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता हा वाद आणखी उफाळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांच्या दालनात सोमवारी राष्टÑवादीच्या नगरसेवकांमध्ये बैठक झाली होती. तीत भावी विरोधी पक्षनेता कोण यावरून वाद निर्माण झाला होता. यापूर्वी अडीच वर्षे कळव्याला विरोधी पक्षनेतेपद दिले असल्याने आता ते ठाण्याला मिळावे, अशी मागणी ठाण्यातील नगरसेवकांनी लावून धरली होती. मात्र, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कळवा आणि मुंब्य्राला विधानसभा निवडणुकीआधी शब्द दिला असल्याने विरोधी पक्षनेतेपद हे कळवा किंवा मुंब्य्रालाच मिळावे, अशी मागणी यावेळी लावून धरण्यात आली होती.

दरम्यान, नेहमीच महापालिकेतील महत्त्वाची पदे ही कळवा किंवा ठाण्याच्या वाटेला गेलेली आहेत. मुंब्य्रावर नेहमीच अन्याय झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या खेपेला विरोधी पक्षनेतेपद हे मुंब्य्राला मिळावे यासाठी येथील १८ नगरसेवक एकवटले आहेत. त्यानुसार येथील नगरसेविका फरझाना शाकीर शेख यांनी याच मागणीसाठी सोमवारी उशिरा शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा दिला. मुंब्य्राला पालिकेत स्थान मिळावे यासाठी त्यांनी राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे.

यासंदर्भात शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत दुजोरा दिला आहे. मात्र, राजीनामा स्वीकारला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आता हा वाद आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. विरोधी पक्षनेतेपदाचा मान कोणाला मिळणार; ठाणे, कळवा की मुंब्रा हे आता पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

बैठकीमधून नाराजांचा काढता पाय
विरोधी पक्षनेतेपद हे कळवा किंवा मुंब्य्राला मिळावे अशी आग्रही भूमिका घेताच आम्ही वरिष्ठांकडून कमिटमेंट घेतली असल्याने ठाण्याकडेच हे पद राहणार असल्याचा दावा राष्टÑवादीच्या ठाण्यातील नगरसेवकांनी केला होता. त्यामुळे नाराज झालेल्या काही नगरसेवकांनी या बैठकीतून काढता पाय घेतला होता.

Web Title: 18 councilors for opposition leader

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.