उल्हासनगर : शॉर्ट टर्म व्हिसावर १७ पाकिस्तानी नागरिक शहरांत वास्तव्यास राहत असल्याची माहिती पोलिस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर त्यांना देश सोडून जाण्याचे आदेश सरकारने काढल्याने, ते सोमवारी देश सोडून जाणार असल्याचेही गोरे म्हणाले. हे सर्व १७ पाकिस्तानी नागरिक हे सिंधी समाजाचे आहेत.
फाळणीच्यावेळी विस्थापित झालेल्या सिंधी समाजाला देशाच्या विविध भागांत वसविण्यात आले. उल्हासनगरात वसविण्यात आलेल्या सिंधी समाजाचे अनेक नातेवाईक आजही पाकिस्तानमध्ये आहेत. सण व विविध उत्सवावेळी ते एकत्र येतात. भारतीय सिंधी सभेच्या प्रयत्नातून आजपर्यंत १४० जणांना भारतीय नागरिकत्व दिल्याची माहिती सिंधी अकादमीचे महेश सुखरामनी यांनी दिली. गेल्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात भारतीय नागरिकत्व दिलेल्या ६५ सिंधी नागरिकांचा सत्कार करण्यात आला होता. शॉर्ट टर्म व्हिसावर आलेल्या १७ सिंधी समाजाच्या पाकिस्तानी नागरिकांना पहलगाम हल्ल्यानंतर देश सोडून जाण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. १७ पाकिस्तानी नागरिक २७ व २८ एप्रिल रोजी पाकिस्तानमध्ये जाणार असल्याची माहिती उपायुक्तांनी दिली.
समाजातील बहुतांश बांधावांचे मूळ गाव पाकिस्तानमध्ये
शहरांत राहणाऱ्या बहुतांश सिंधी समाजातील बांधावांचे मूळ गाव पाकिस्तानमधील असून, ८० वर्षे वयाच्या नागरिकांचा जन्म पाकिस्तानमधील आहे. एकमेकांचे नातेसंबंध टिकविण्यासाठी पाकिस्तानमधील सिंधी बांधव शहरांत राहत असलेल्या नातेवाइकांना भेटण्यासाठी शॉर्ट टर्म व्हिसा घेऊन येतात. भारतीय सिंधू सभा अशा नागरिकांना भारतीय नागरिकत्व देण्यासाठी पुढाकार घेत असल्याची माहिती महेश सुखरामनी यांनी दिली.
पनवेल : काश्मीरमधील पहलगाम येथील आतंकवादी हल्ल्यात पनवेलमधील दिलीप देसले यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर आणखी दोन पर्यटक यात जखमी झाले. यापैकी कामोठ्यातील जखमी पर्यटक सुबोध पाटील यांच्यावर अद्यापही श्रीनगरमधील लष्करी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याच रुग्णालयात जाऊन नुकतीच काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी भेट घेऊन पाटील यांच्या तब्येतीची विचारपूस केली.
पहलगाम घटनेत सुबोध पाटील आणि त्यांची पत्नी थोडक्यात बचावले. दहशतवाद्यांची एक गोळी सुबोध पाटील यांच्या मानेला चाटून गेली. पाटील यांची तब्येत सुधारत असून त्यांना लवकरच डिस्चार्ज देण्यात येणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील सुबोध पाटील यांची भेट घेतली होती. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यावर त्यांना सुखरूप त्यांच्या घरी सोडण्यात येईल, असेही शिंदे यांनी त्यांना सांगितले आहे.