नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या वैष्णवी आडकर आणि आकांक्षा नित्तुरे यांनी सोमवारी नवी दिल्लीतील डीएलटीए कॉम्प्लेक्स येथे सुरू असलेल्या २८व्या फेनेस्टा ओपन नॅशनल टेनिस चॅम्पियनशिप २०२३ मध्ये आपापल्या पहिल्या फेरीत विजयी सलामी दिली.
महिला एकेरी गटात खेळताना, चौथ्या क्रमांकाची वैष्णवी सुरुवातीपासूनच कोर्टवर सकारात्मक दिसली आणि तिने उत्कृष्ट क्रॉसकोर्ट शॉट्ससह दबदबा राखला. तिने महाराष्ट्राच्या सोनल पाटीलचा ६-३, ६-२ असा सरळ सेटमध्ये पराभव करून स्पर्धेची दुसरी फेरी गाठली. महाराष्ट्राची आकांक्षानेही स्पर्धेच्या पहिल्या फेरीत उत्कृष्ट फोरहँड्सचा खेळ करताना साहिरा सिंगचा ६-२, ६-१ असा सरळ सेटमध्ये पराभव करून पुढील फेरीत प्रवेश केला.
दुसरीकडे, पाचव्या क्रमांकाच्या शर्मदा बाळूने (कर्नाटक) तेलंगणाच्या पावनी पाठकचा ६-२, २-४, ६-२ असा पराभव करून पुढील फेरी गाठली. तामिळनाडूच्या गतविजेत्या मनीष सुरेशकुमारने पुरुष एकेरी गटात मान केशरवानी (उत्तर प्रदेश) वर विजय मिळवला. त्याने हा सामना ६-४, ६-४ असा जिंकला. राष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत कनिष्ठ श्रेणींसाठी २१.५ लाखाहून अधिक आकर्षक बक्षीस दिली जाणार आहेत.