सध्या मोबाईल, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि ईलेक्ट्रीक वाहनांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बॅटऱ्यांचा वापर केला जात आहे. परंतू, या बॅटरी खर्चिक आणि अल्पायुषी आहेत. तसेच त्या लवकर संपत असल्याने वारंवार चार्ज कराव्या लागतात. या बॅटऱ्यांमध्ये संशोधन होत आहे. जास्त लाईफ देणाऱ्या वेगवेगळ्या पदार्थांपासून या बॅटऱ्या बनविण्यात येत आहेत. अशातच संशोधकांनी जगातील पहिली न्युक्लिअर पॉवर बॅटरी तयार केली आहे. तिची एका चार्जची लाईफ पाहिली तर शेकडो पिढ्यांना ती उर्जा देणार आहे.
ब्रिटनच्या युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिस्टलच्या संशोधकांनी ही बॅटरी विकसित केली आहे. या बॅटरीमध्ये कार्बन-१४ नावाचा रेडिओएक्टिव्ह पदार्थ वापरण्यात आला आहे. याची निम्मे आयुष्य हेच ५७३० वर्षे एवढे प्रचंड आहे. ही बॅटरी डायमंड आधारित संरचनेमध्ये कार्बन १४ जोडून वीज उत्पन्न करते.
सर्वात महत्वाची बाब म्हणजे या बॅटरीला अन्य बॅटरींप्रमाणे मेन्टेनन्सची किंवा अन्य कोणत्या प्रक्रियेची गरज नाही. रेडिओएक्टिव्ह प्रक्रियेवेळी वेगवान इलेक्ट्रॉनना ऊर्जेमध्ये परिवर्तित केले जाते. डायमंड रचना किरणोत्सर्गी किरणे पकडते व उर्जा निर्माण करते. सोलर सेल्समध्ये जसे फोटॉन्सना वीजेत रुपांतरीत केले जाते, अगदी तशीच ही प्रक्रिया आहे.
ही अणुऊर्जा जरी असली तरी ती घातक नाही. कार्बन-14 कमी-श्रेणीचे किरणोत्सर्ग उत्सर्जित करतो. यामुळे ते डायमंड संरचनेतच राहतात. यामुळे ही बॅटरी व्यावहारिक वापरासाठी उपयुक्त असल्याचा दावा रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. ब्रिस्टल विद्यापीठातील ऊर्जा सामग्री तज्ज्ञ प्रोफेसर नील फॉक्स यांच्यानुसार हिरा हा जगातील सर्वात कठीण पदार्थ आहे, त्याच्याएवढे कोणीच संरक्षण देऊ शकत नाही.