भारतात जेव्हा फोरजी सुरु झाले तेव्हा रिलायन्स जिओ आणि शाओमी हे समीकरणच बनले होते. त्यापूर्वीपासून शाओमीचे फोन प्रत्येकाच्या हातात दिसत होते. परंतू, आता शाओमी खूपच मागे पडली आहे. काही वर्षांपूर्वी नोकियाचे जे झाले होते ते आता शाओमीसोबत होताना दिसत आहे. भारतातून शाओमी कमी होऊ लागली आहे.
भारतीय बाजारात शाओमीची विक्री दिवसेंदिवस कमी होऊ लागली आहे. व्हिवो, सॅमसंग, ओप्पो या कंपन्यांनी शाओमीचे मार्केट हलवून टाकले आहे. एकेकाळी शाओमीची विक्री सर्वाधिक होती, ती आता तळाला जाताना दिसत आहे. कमी होत चाललेली शिपमेंट, गोठलेला पैसा आणि वाढत्या नियामक दबावांमुळे शाओमी भारतीय बाजारात झगडत आहे.
नुकत्याच आलेल्या आयडीसी रिपोर्टनुसार शाओमीच्या शिपमेंट भारतात गेल्या वर्षीच्या तुलनेत दुसऱ्या तिमाहीत २३.५ टक्क्यांनी घसरल्या आहेत. एवढेच नाहीतर शाओमी पहिल्या पाचातूनही बाहेर पडली आहे. रेडमी ब्रँड देखील फारसा चालत नाहीय. रेडमीचे मार्केट ओप्पो, वनप्लसचा सहकारी ब्रँड रिअलमीने संपविले आहे. नाही म्हणायला पोको तेवढा थोडाफार दिसत आहे. मध्यम ते प्रिमिअम श्रेणीतील फोनची विक्री मोठ्या प्रमाणावर घटली आहे. या श्रेणीचा ग्राहक ओप्पो, व्हिवो, वनप्लस या कंपन्यांकडे वळू लागला आहे.
आयकर विभाग, ईडी आणि इतर एजन्सींच्या चौकशीमुळे कंपनीचे ४७०० कोटी रुपये अडकलेले आहेत. २०२२ पासून अनेक प्रमुख व्यक्तींनी कंपनी सोडली आहे. ब्रँडने त्यांचे मार्केटिंग खर्च देखील कमी केले आहेत. जेव्हा फोरजी आलेले तेव्हा कंपनीचा जगातील उत्पन्नाचा ४५ टक्के वाटा हा भारतातून येत होता. आता हा आकडा एका आकड्यावर येऊन ठेपला आहे. शाओमीने आता भारतातून लक्ष काढून घेतल्याचेच हे संकेत दिसत आहेत.