लहान मुल असो की वयोवृद्ध, भारतात सारे रीलवेडे झालेले आहेत. एकदा का मोबाईल हातात घेतला की १००-२०० रील्स पाहिल्याशिवाय तो हातातून सुटतच नाहीय. अशातच भारतात या रीलच्या दुनियेतील पारडे पलटले आहे. इन्स्टाग्रामवरील रील्स युट्यूबला मागे टाकून पुढे गेली आहेत.
रीलस्टार यातून लाखो रुपये कमवू लागले आहेत. आता मेटाच्या दाव्यानुसार इन्स्टाग्राम रील्स शॉर्ट व्हिडीओ कंटेंटमध्ये एक नंबरला आहे. रील्सनी भारतात पाच वर्षे पूर्ण केली आहेत. या पाच वर्षांत किती जणांचे डोळे कामातून गेले, किती जणांना जाड भिंगाचे चष्मे लागलेत याची गणतीच न केलेली बरी, एवढ्या मोठ्या प्रमाणावर रील्स बनविले गेले आणि पाहिले गेले आहेत.
मेटाने केलेल्या आयपीएसओएस अभ्यासात, देशभरातील ३३ शहरांमधील ३,५०० हून अधिक लोकांशी संपर्क साधण्यात आला. शॉर्ट-फॉर्म व्हिडिओ आता भारतात सर्वाधिक पाहिले जाणारे कंटेंट बनले आहेत. सुमारे ९७% लोक दररोज कोणत्या ना कोणत्या प्लॅटफॉर्मवर शॉर्ट व्हिडिओ पाहतात आणि त्यापैकी ९२% लोक रीलला त्यांची पहिली पसंती मानतात. ८०% लोक आमच्या प्लॅटफॉर्मवर नवीन ब्रँड शोधत असल्याचे मेटाने म्हटले आहे.
रील्सवरील जाहिराती या नेहमीच्या लांबलचक व्हिडीओंवरील जाहिरातीपेक्षा जास्त लक्षवेधक असतात. तसेच ४ पट जास्त संदेश पोहेचवितात. याचबरोबर ब्रँडचे मॅट्रीक्स १.५ पट जास्त वाढवितात. याचाच फायदा अनेक प्रकारच्या उद्योगांना, उत्पादनांना होत आहे. इन्स्टा रील्सवर फॅशन आणि ट्रेंडशी संबंधित कंटेंट ४०% जास्त पाहिले जात आहेत. मेकअप व्हिडिओ २०% जास्त तर संगीत आणि चित्रपटाशी संबंधित कंटेंट १६% जास्त पाहिले जात आहेत असेही मेटाने म्हटले आहे.