सध्या अनेकांना नाव एकाचे येतेय, फोन दुसऱ्याचाच येतोय. टेलिमार्केटिंग, फ्रॉड करणारे आदींचे फोन घेऊन लोक वैतागले आहेत. अनेकांना लाखोंचा चुनाही लागला आहे. यामुळे आता यापासून वापरकर्त्यांना सोडविण्यासाठी दूरसंचार विभागाने टेलिकॉम कंपन्यांना सक्तीचे आदेश दिले आहेत.
यामध्ये इनकमिंग कॉलवेळी सिमा कार्ड ज्याच्या नावावर आहे त्याचे खरे नाव दिसणार आहे. कॉलिंग नेम प्रेझेंटेशन (CNAP) ही सेवा तात्काळ सुरु करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. स्पॅम आणि घोटाळेबाजांच्या कॉलना थांबविण्याचा यामागचा उद्देश आहे.
सध्या अनेकदा नाव मुलाचे येते आणि मुलगी बोलत असल्याचे अनुभव आले आहेत. तसेच सरकारी यंत्रणेचे नाव ट्रूकॉलर सारख्या वेबसाईटवर नोंदवून विमा, क्रेडिट कार्ड, पर्सनल लोनसाठी फोन केले जात आहेत. अनेकदा पर्सनल नंबरही वापरले जात आहेत.
सध्या कंपन्या यावर प्रयोग करत असून काम सुरु असल्याचे या कंपन्यांनी डॉटला कळविले आहे. इंटर सर्कल कॉलवर हे काम केले जात आहे. हे तंत्रज्ञान उपलब्ध होताच ते लागू केले जाणार असल्याचा शब्द कंपन्यांनी दिला आहे. तांत्रिक अडचणींमुळे हे २जी नेटवर्कवर लागू करता येणार नाही, असेही कंपन्यांनी डॉटला कळविले आहे.